मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेंची NIA कडून चौकशी सुरू... - mumbai police officer sachin vaze is present at the nia office to record his statement Mansukh Hiren | Politics Marathi News - Sarkarnama

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेंची NIA कडून चौकशी सुरू...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

सचिन वाझे दुपारी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कार्यालयात पोहोचले आहेत.

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी पोलिस अधिकारी  सचिन वाझे यांची एनआयएकडून (NIA) जवळपास तीन तासाहून अधिक काळ चौकशी सुरू आहे. एनआयएच्या ऑफिसबाहेर गावदेवी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. सध्या सचिन वाझे एकटेच चौकशी साठी हजर आहेत. 

दिल्लीहून एनआयएचे वरिष्ठ अधिकारी चैाकशीसाठी आले आहेत.  ठाणे येथील व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सचिन वाझे दुपारी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कार्यालयात पोहोचले आहेत. तीन तासापासून त्यांची चैाकशी सुरू आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन भरलेली गाडी सापडली त्याबद्दलचा तपास केंद्रीय गृहखात्याने कालच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला. हिरेन यांच्या ताब्यातील ही गाडीच अंबानी यांच्या घरासमोर होती. त्यानंतरच हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास सुरवातील सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यामुळे हिरेन आणि वाझे यांचे संभाषण झालेले होते. त्यानंतरच वाझे यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे थेट वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंनी आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. 

सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं  व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्याशी वरिष्ठांनी संपर्क केला आहे. 

सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अटक पुर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी आहे. सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. 

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सत्र न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. त्याची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या सुनावणीच्या आधी न्यायालय एटीएसकडून याप्रकरणाची माहिती घेण्याची शक्यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख