बंगालमध्ये मोदींची सभा अन् ममतांना बसणार आणखी एक धक्का...

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच तृणमूलला अनेक मोठे धक्के बसले आहेत.
MP Sisir adhikari will join bjp in presence of PM Narendra Modi
MP Sisir adhikari will join bjp in presence of PM Narendra Modi

कोलकता : मतदानासाठी काही दिवस उरलेले असताना पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसणार आहे. मागील अनेक वर्षांपासून तृणमूलमध्ये असलेले खासदार पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ममतांची बंगालमधील वाट अधिक बिकट होत चालली आहे.

बंगालमध्ये निवडणूकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच तृणमूलला अनेक मोठे धक्के बसले आहेत. भाजपने ममता सरकारमधील मंत्री तसेच आमदार फोडले आहेत. ममता यांच्याविरोधात नंदीग्राममधून मैदानात उतरलेले सुवेंदु अधिकारी हे काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आले आहेत. तसेच जवळपास १० ते १५ आमदारांनीही तृणमूलला रामराम ठोकला आहे. 

आता सुवेंदु अधिकारी यांचे वडील व तृणमूलचे खासदार शिशिर अधिकारी हेही भाजपच्या वाटेवर आहेत. सुवेंदु यांनीच याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २४ मार्चला बंगालमध्ये प्रचार सभा होणार आहे. या सभेत आपले वडील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याआधीच २१ मार्चला गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचार रॅलीमध्येही ते सहभाग घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुवेंदूंनी पक्ष सोडल्यापासून त्रास

शिशिर अधिकारी यांनीही बुधवारी तृणमूलवर जाहीर टीका केली. ते ८० वर्षांचे आहेत. कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोण म्हणते मी तृणमूलमध्ये आहे? तृणमूल पक्ष तरी मानतो का? सुवेंदूने पक्ष सोडल्यापासून आमच्या कुटूंबाला त्रास दिला जात आहे. कोलकताहून आलेले नेते सुवेंदुला मीर जाफर म्हणतात. नंदीग्राममध्ये ममता काय करत आहेत. येथील लोकांसाठी हे निराशादायी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

ममतांवर केली टीका

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हल्ला झाला. काही लोकांनी आंदोलन केले आणि त्यानंतर त्या म्हणतात, हल्ला झाला नाही तर दरवाजा लागला. त्यांना कसली दुखापत झाली आहे. कोण डॉक्टर आहेत ते. एका छोट्याशा धक्क्याने त्यांच्या पायाला प्लास्टर करावे लागले, असे अनेक सवाल शिशिर अधिकारी यांनी उपस्थित केले. तसेच मला संधी मिळाल्यास पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत नक्की जाईन. त्यात काहीच अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या मुलाचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, शिशिर अधिकारी यांच्या भाजप प्रवेशावर तृणमूलने टीका केली आहे. तृणमूलचे खासदार सौगत रॉय म्हणाले, शिशिर अधिकारी ८० वर्षांचे आहेत. त्यांचा सन्मान करतो. पण या वयात त्यांनी 'दल बदलू' बनू नये. त्यांचे पक्षाशी असलेले अंतर अपरिहार्य आहे. त्याचा तृणमूलवर काही परिणाम होणार नाही, असेही रॉय म्हणाले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com