ब्रेक दुरूस्त होत नाही म्हणून हॉर्नचा आवाज वाढवणारा मेकॅनिक... - MP Shashi Tharoor slams BJP Government over Budget | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेक दुरूस्त होत नाही म्हणून हॉर्नचा आवाज वाढवणारा मेकॅनिक...

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावरून भाजप सरकारला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावरून भाजप सरकारला टोला लगावला आहे. 'भाजप सरकार म्हणजे ब्रेक ठीक होत नाहीत म्हणून हॉर्नचा आवाज वाढविणारा मेकॅनिक' अशा शब्दांत त्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 

अर्थसंकल्पाचे सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. तर विरोधकांकडून त्यावर टीका केली जात आहे. सर्वसामान्य तसेच शेतकऱ्यांना दिलासा नसल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. कोरोना संकटात कोट्यावधी लोकांना रोजगार गेला. त्यांनाही काही दिलासा दिला गेला नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विटरवरून भाजप सरकारवर निशाणा साधला.

'हे भाजप सरकार मला मेकॅनिकची आठवण करून देते. जो आपल्या ग्राहकाला म्हणतो, मी तुमच्या गाडीचे ब्रेक ठीक करू शकत नाही. त्यामुळे गाडीच्या हॉर्नचा आवाज वाढविला आहे,' असे ट्विट थरूर यांनी केले आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांनीही टीका केली असून ते म्हणतात, 'अर्थसंकल्पात केवळ खाजगीकरण, खाजगीकरण आणि खासगीकरणचे ऐकायला मिळाले. देशाची मौलिक संपत्ती मुठभर श्रीमंतांना विकण्याची या सरकारची इच्छा आहे.'

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी टीका करताना म्हटले की, ''कोरोनाचा संसर्ग नैसर्गिकरीत्या कमी होत असताना अर्थमंत्र्यांनी खासगी कंपन्यांच्या चाचणी न झालेल्या लसीसाठी 35 हजार कोटींची घोषणा केली आहे. पण हा पैसा नोकीर गेलेल्या गरीब कामगार आणि शेतकऱ्यांच्या पिकांसाठीच्या किमान आधारभूत किंमतीसाठी दिला जात नाही.''

करदात्यांची घोर निराशा; प्राप्तीकरात दिलासा नाही

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी करदात्यांची घोर निराशा केली आहे. कोरोनामुळे आर्थिक संकट ओढवलेल्या करदात्यांना सवलतीची अपेक्षा होती. पण अर्थमंत्र्यांनी कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळाला नाही. 

कोरोना काळात अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. व्यवसायामध्ये तोटा झाल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. तर अनेकांची वेतन कपात झाली. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये कर भरण्यातून काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण त्याबाबत अर्थमंत्र्यांनी काहीच घोषणा केली नाही. अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येक करदात्याची यामुळे निराशा झाली आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

अर्थमंत्र्यांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. यापुढे 75 वर्षांपुढील नागरिकांना प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यातून सूट देण्यात आली आहे. त्यांच्या बँक खात्यातूनच प्राप्तीकराची रक्कम घेतली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

अर्थमंत्री सीतारामण यांनी अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे दरवर्षी प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीतून त्यांची सुटका होणार आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे प्राप्तीकर भरण्यासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे सातत्याने मुदतवाढ द्यावी लागली. 

LIC ची शेअर बाजारात नोंदणी होणार

निर्गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. लाईफ इन्सुरन्स काॅपोर्रेशनची (LIC) शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. तसेच एका सरकारी विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचाही निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला. विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक ही 49 टक्क्यांवरून 74 टक्के करण्याचा मोठा निर्णय सीतारामन यांनी जाहीर केला.  मोठ्या कंपन्या निर्गुंतवणुकीमधून 1 लाख 75 हजार कोटींची निधी उभारण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात याविषयीचे भाष्य केले होते. मात्र या वर्षी कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्यानंतर LIC चा हिस्सा सरकार विकणार आहे. जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, अशी टॅगलाइन असलेली ही सरकारी विमा कंपनी शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येण्याचा अंदाज आहे. 

निवडणूक होणाऱ्या राज्यांसाठी भरीव तरतूद

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तेथील महामार्गांच्या कामासाठी तब्बल 25 हजार कोटी रुपयांची घोषणा केली. सुमारे 675 किलोमीटर लांबीची रस्तेबांधणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू आणि आसाममध्ये होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भरीव निधीची घोषणा केली आहे. 

कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य सुविधांवर मोठा खर्च करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केली. कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा त्यांनी केली.
 कोरोना काळात सरकारने गरजूंसाठी केलेल्या उपाययोजनांचा थोडक्यात आढावा अर्थमंत्र्यांनी घेतला. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारने सर्व त्या उपाययोजना केल्या. प्रधानमंत्री गरीब अर्थसहाय्य योजनेची अंमलबजावणी सरकारने केली. आत्मनिर्भर भारतासाठी जीडीपीच्या १३ टक्के पॅकेज दिले, असे त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख