खासदार डेलकर आत्महत्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव...   - mp mohan delkar suicide case collector sandeep kumar singh approaches bombay hc | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार डेलकर आत्महत्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची उच्च न्यायालयात धाव...  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संदिप कुमार सिंह यांचे नाव आहे. 

मुंबई : खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी सिल्व्हासा येथील जिल्हाधिकारी संदिप कुमार सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संदिप कुमार सिंह यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 
 
आपली आणि डेलकरांची कधीही वैयक्तिक ओळख नव्हती, डेलकरांच्या संस्थेची आपण फक्त चौकशी केली होती. तसेच ही घटना ही मुंबईत घडली असली तरी कथित गुन्ह्याचे मूळ हे दादरा नगर हवेलीमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे एफआयआर तिथं वर्ग होणे अपेक्षित होतं मात्र केवळ राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा याचिकेतून  संदिप कुमार सिंह यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल करण्यात आलेली एफआयआर बिनबुडाची आणि चुकीची आहे. आपल्याविरोधात या एफआयआरमध्ये कोणताही विशिष्ट आरोप करण्यात आलेला नाही, असे त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या  मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. 

डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट लिहिली होती. तपासणीतही ते देलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली. त्यात सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्यांचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने डेलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यातही ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप मुख्य अहवाल येणे बाकी आहे. डेलकर कुटुंबीयांच्या फिर्यादी नंतर याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यात संदिप कुमार सिंह यांचे नाव आहे. 

अनेक स्थानिक कार्यक्रमात त्यांना बोलवले जात नव्हते, मोहन डेलकर यांना वेळोवेळी अपमानीत केले जात होते.याबाबत त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. यावेळी काही स्थानिक अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केला होता.या संदर्भात त्यांनी नितीश कुमार यांची भेटही घेतली होती. यावर  एक समिती स्थापन केली होती. मात्र त्या पूर्वीच मोहन यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी देलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. गुजराती भाषेत ही सुसाईड नोट लिहिली होती.

सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. 

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख