दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही.. नवाब मलिकांचा सरकारवर आरोप   - monopoly in the field of telecommunication Nawab Malik accuses the modi government | Politics Marathi News - Sarkarnama

दूरसंचार क्षेत्रात एकाधिकारशाही.. नवाब मलिकांचा सरकारवर आरोप  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

सध्या दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या ग्राहकसेवेत अडथळे निर्माण होत आहेत.

मुंबई : दूरसंचार क्षेत्रात (टेलिकॉम सेक्टर) एकाधिकारशाही निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची पावले पडत आहे. केंद्र सरकारचा यामागील हेतू काय, त्यांना तपशील (डाटा) गोळा करायचा आहे की एका कंपनीला सारे काही द्यायचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नबाब मलिक यांनी केला आहे. 

टेलिफोन बूथसारखी वायफाय सेंटर उघडण्याचे केंद्राचे प्रस्तावित धोरण आहे. मात्र ते धोरण नेमके कोणासाठी आहे, ते केवळ एकाच कंपनीसाठी आहे का, कोणा मित्राला फायदा व्हावा यासाठी हे होत आहे का, अशी टीकाही मलिक यांनी केली आहे. 

सध्या दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या ग्राहकसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. त्यांच्या नेटवर्कमध्ये व्यत्यय येत आहेत. देशात दूरसंचार विभागाअंतर्गत येणाऱ्या एमटीएनएल, बीएसएनएल आदी सर्व व्यवस्था ठप्प झाल्या आहेत. त्या सुधारण्याकडे कोणीही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे हे सगळं एकाच कंपनीला देण्याची तयारी सुरु आहे. या साऱ्या गोष्टी मुद्दाम होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

एकाधिकारशाही करुन केंद्र सरकारला डाटा गोळा करायचा आहे का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. याअगोदर आधारकार्डच्या माध्यमातून डाटा गोळा करून दुरुपयोग करण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. 

ही सगळी वाटचाल एका विशिष्ट कंपनीसाठी आहे. त्यामुळे देशाला फार मोठा धोका पोहोचू शकतो. खुल्या बाजारपेठेत ग्राहकांच्या हितासाठी स्पर्धा असलीच पाहिजे, त्यामुळे एकाधिकारशाहीच्या दृष्टीने सरकार पावले टाकत असेल तर ते योग्य नाही. यामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही मलिक यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानवादी आणि चीन आहेत, असा आरोप करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा," अशी मागणीनवाब मलिक यांनी आज येथे केली. नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकर्‍यांच्यामागे खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन आहे, असा दावा नुकताच दानवे यांनी केला होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. दानवे यांचे म्हणणे खरे असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर या शेतकऱ्यांशी चर्चा का करीत आहेत, असाही प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. 

दानवे यांच्या वक्तव्यावर मलिक यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचे वक्तव्य ही सरकारची भूमिका आहे की, रावसाहेब दानवे यांची वैयक्तिक भूमिका आहे हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकारची अशीच भूमिका असेल तर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत बैठका का घेतल्या, गृहमंत्री अमित शहा देखील शेतकऱ्यांबरोबर बैठका का घेत आहेत, याचे उत्तर मिळावे. सरकारचीच ही भूमिका असेल तर याबाबत आतापर्यंत सरकारने काय केलं आहे, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे, असे वक्तव्य करून दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. दानवे यांची ही वैयक्तिक भूमिका असेल तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख