अँटीबॅाडी कॅाकटेल गेमचेंजर ठरणार? डोस दिल्यानंतर दोन रुग्ण बारा तासांत घरी - Monoclonal Antibody Cocktail Therapy could prove to be a game changer | Politics Marathi News - Sarkarnama

अँटीबॅाडी कॅाकटेल गेमचेंजर ठरणार? डोस दिल्यानंतर दोन रुग्ण बारा तासांत घरी

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

जास्त धोका असलेल्या गटातील रुग्णांना हे औषध वेळेत दिल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासणार नाही.

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात काही दिवसांपासून मोनोक्लोनल अँटीबॅाडी कॅाकटेल (Monoclonal Antibody Cocktail) औषधाचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. त्याचे सकारात्मक परिणामही दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच एका खासगी रुग्णालयातील 74 वर्षीय रुग्णाला हे औषध दिल्यानंतर काही तासांत घरी सोडण्यात आले होते. (Monoclonal Antibody Cocktail Therapy could prove to be a game changer)

आता दिल्लीतील एका रुग्णालयांमध्येही दोन रुग्णांवर नुकताच या औषधांचा वापर करण्यात आला. त्यानंतर केवळ 12 तासांतच त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामध्ये एका 80 वर्षीय रुग्णाचाही समावेश आहे. नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात हे उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांना या औषधाचा डोस दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याचे रुग्णालयातील डॅाक्टरांनी सांगितले. लक्षणे आढळून आल्यानंतर सुरूवातीलाच हे औषध दिल्यास रुग्णांना फुफ्फुसात होणाऱ्या संसर्गापासून वाचविता येऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. 

हेही वाचा : गुड न्यूज : कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील चूकही आता दुरूस्त करता येणार

रुग्णालयातील डॅा. पुजा खोसला यांनी सांगितले की,  80 वर्षीय रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही त्यांना हे औषध दिल्यानंतर पुढील धोका टाळता आला. तसेच 36 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला तीव्र स्वरूपाचा ताप, खोकला तसेच प्रकृती ढासळली होती. दोघांनाही हे औषध दिल्यानंतर पुढील काही तासांतच परिणाम जाणवू लागला. त्यामुळे हे औषध गेमचेंजर (Game-Changer) ठरू शकते. जास्त धोका असलेल्या गटातील रुग्णांना हे औषध वेळेत दिल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचीही गरज भासणार नाही. तसेच इतर औषधांचा अतिरिक्त वापरही टाळता येईल. त्यामुळे म्युकरमायकोसिस तसेच रुग्णालयात होणारे इतर संसर्गही रोखता येऊ शकतात, असे खोसला यांनी स्पष्ट केलं.

काय आहे अँटीबॅाडी कॅाकटेल?

Casirivimab आणि Imdevimab या दोन औषधांना एकत्रित करून हे अॅंटीबॅाडी कॅाकटेल बनविण्यात आले आहे. प्रत्येक १२०० मिलीग्रॅमच्या डोसमध्ये ही औषधे समप्रमाणात एकत्र केली जातात. त्यातून हा कॅाकटेल डोस तयार होतो. प्रत्येक पॅकमध्ये दोन रुग्णांवर उपचार होऊ शकतात. या एका पॅकची किंमत १ लाख १९ हजार ५०० एवढी आहे. तर एका डोससाठी ५९ हजार ७५० रुपये मोजावे लागतील, असे कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

हे औषध मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जाऊ शकते. औषध घेतल्यानंतर रुग्णालयात भरती होण्याचा किंवा मृत्यूचा धोका ७० टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतामध्ये सध्या एक लाख पॅक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आले. सिप्लाकडून हे औषध भारतीय बाजारात आणण्यात आले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून हे औषध सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल. केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रक संस्थेने (CDSCO) ने या औषधाला आप्तकालीन वापरासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. 

झायडस कॅडिया या कंपनीनेही असेच अँटीबॅाडी कॅाकटेल (ZRC-3308) तयार केले आहे. या औषधाच्या प्राण्यांवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये फुफ्फुसावर होणारा घातक परिणाम कमी करण्याची क्षमता असल्याचे आढळून आले आहे. तसेच हे सुरक्षित असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. आता मानवी चाचण्यांसाठी कंपनीकडून भारतीय औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष रुग्णांवर या औषधांची चाचणी सुरू होईल. या औषधामध्ये दोन मोनोक्लोनल अँटीबॅाडीजचे कॅाकटेल असून त्यामुळं नैसर्गिक अँटीबॅाडींमध्ये वाढ होते. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख