मोदी-योगींची जोडी बिहारमध्ये ठरली सुपरहीट  - Modi-Yogi duo became a super hit in Bihar | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी-योगींची जोडी बिहारमध्ये ठरली सुपरहीट 

मंगेश वैशंपायन 
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

योगी यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीचा गड फोटोफिनीश पद्धतीने जिंकताना बिहारमध्येही भाजपला मोठी मदत केल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या 12 प्रचारसभा झाल्या, त्या परिसरातील सुमारे 55 जागांवर भाजप आघाडी विजयाच्या जवळ आहे. मोदी यांची जादू देशात कायम असल्याचे भाजप नेते सांगत असले तरी बिहारमध्ये मात्र राष्ट्रीय जनता दल-कॉंग्रेस-डाव्यांच्या आघाडीने त्यांच्या सभा झालेल्यापैकी किमान 44 जागांवर बाजी मारल्याचे दिसते. 

दुसरीकडे बिहारमध्ये चांगलाच प्रभाव असलेल्या गोरक्षपीठाचे प्रमुख व उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 18 सभा झाल्या, त्यातील किमान 10 जागांवर फक्त व फक्त भाजप उमेदवार विजयी झाल्याचे दिसते. योगी यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीचा गड फोटोफिनीश पद्धतीने जिंकताना बिहारमध्येही भाजपला मोठी मदत केल्याचे दिसत आहे.

लॉकडाऊनच्या काळात बिहारच्या लाखो स्थलांतरित मजुरांना उत्तर प्रदेशाच्या सीमा भागांतील त्यांच्या त्यांच्या गावांपर्यंत पोचविण्यात योगी यांच्या सरकारने केलेली मोठी मदत भाजपच्या कामी आली, असे चित्र आहे. 

मोदी यांनी 4 टप्प्यांत ज्या 12 सभा घेतल्या त्या परिसरातील विधानसभा जागांचे कल पाहिले तर जेथे सभा झाली, त्या बहुतांश शहरी मतदारसंघांत भाजप-जदयू उमेदवार विजयी झाले आहेत. पश्‍चिम चंपारण्य (8 पैकी 8) सासाराम (7), फरबीसगंज (6) येथे सर्वच्या सर्व आणि भागलपूर (7 पैकी 6), पूर्व चंपारण्य (12 पैकी 8 ते 9) सारख्या जागांवर एनडीएचा वरचष्मा दिसतो आहे. मात्र सासाराम (7), पाटणा (एनडीए 5 व राजद-कॉंग्रेस-डावे 9) मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरुद्धची नाराजी पंतप्रधान मोदींच्या सभांनी बरीचशी कमी केल्याचे भाजप नेते सांगतात. त्या साऱ्या विधानसभा मतदारसंघांत मतदारांनी एनडीएवर जास्त विश्‍वास दाखवला, तरी मोदी यांच्या शब्दांतील जंगलराजला पुरते धुडकावले, असेही दिसत नाही. 

योगी आदित्यनाथ यांच्या सभा कोठे घ्यायच्या याबद्दलची भाजपची रणनीती कमालीची यशस्वी ठरल्याचे दिसते. योगी यांच्या सभा प्रामुख्याने बिहार-उत्तर प्रदेशाचा सीमावर्ती भाग, पूर्व व उत्तर बिहार आणि मिथिलांचल याच भागात घेण्यात आल्या. या भागांत गोरक्षपीठाचा प्रचंड प्रभाव मानला जातो. येथेच भाजपला 2015 मध्ये मार खावा लागला होता.

यंदा त्याची भरपाई झाली, त्यात योगींचा वाटा लक्षणीय दिसत आहे. योगींनी सभा घेतलेल्या पूर्णिया, सहरसा, सिवान, गोरैया कोठी, भागलपूर, गोविंदगंज, झंझारपूर व दरभंगा या जागांवर एनडीए नव्हे तर फक्त भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. 

डाव्यांची मुसंडी अन्‌ भाजपची बंगालसाठी मोर्चेबांधणी 

दरम्यान, तेजस्वी यादव यांच्या राजदसाठी कॉंग्रेसचा हात कामी आला नसला तरी डाव्या पक्षांनी बिहारच्या आपल्या जुन्या गडामध्ये मारलेली मुसंडी तेजस्वी यांच्यासाठी प्रचंड मदत करणारी ठरली, याकडे भाजप नेते लक्ष वेधतात. हे असे होणे आगामी पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला अजिबात परवडणारे नाही व ते आताच रोखायला पाहिजे, असे सांगताना त्यादृष्टीने भाजपच्या वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी व विचारमंथन सुरू झाले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख