मोदींचा नवा मंत्र "फिटनेसचा डोस, अर्धा तास रोज "   

महामारीच्या काळात रोज प्रत्येकाने किमान अर्धा तास काही ना काही व्यायाम, योगा यांच्यासाठी जरूर द्यावा, असे आवाहन त्यांनी आवर्जून केले.
03_166.jpg
03_166.jpg

नवी दिल्ली : तंदुरूस्त भारत (फिट इंडिया) उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट कप्तान विराट कोहली याच्यासह व्यायाम, आहार व योगाच्या क्षेत्रातील मान्यवरांशी बेवसंवाद साधला. यावेळी त्यांनी "फिटनेसचा डोस, अर्धा तास रोज" हा नवीन मंत्र दिला. महामारीच्या काळात रोज प्रत्येकाने किमान अर्धा तास काही ना काही व्यायाम, योगा यांच्यासाठी जरूर द्यावा, असे आवाहन त्यांनी आवर्जून केले.

पंतप्रधानांनी पैरालिंपिक सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझरिया, जम्मू-कश्‍मीरची महिला फुटबॉल खेळाडू अफशा आशिक, मॉडेल मिलिंद सोमण, आहार विशेषज्ञ ऋजुता दिवेकर आदींबरोबर संवाद साधला. 

एका वर्षातच फिट इंडिया ही लोकांची चळवळ बनली असे पंतप्रधान म्हणाले. या सर्वांनीही आपले तंदुरूस्तीचे अनुभव यावेळी सांगितले. विराटच्या फिटनेस प्रेमाला दाद देताना मोदींनी, "तुझ्यामुळे दिल्लीच्या प्रसिध्द छोले भटुरे यांचे मोठे नुकसान झाले,' असे हसतहसत सांगितले. सोमण यांच्या 81 वर्षीय आईंचा व्यायाम (पुश अप्स) करतानाचा व्हिडीओ आपण अनेकदा पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. दिवेकर यांच्याशी बोलताना मोदींनी, फीट राहण्यासाठी मी आठवड्यातून एकदोनदा तरी शेवग्याच्या शेंगेचे (मोरिंगा) पराठे जरूर खातो, असं गुपित सांगितलं.
 
काय म्हणाले पंतप्रधान 

  1. अफशा ही देशाच्या मुलींसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. काश्‍मीरच नव्हे तर देशातील अनेक मुलींही तिच्यापासून प्रेरणा घेत फुटबॉलकडे वळल्या आहेत.
  2. नियमितपणे व्यायामाचे फायदे कोरोनाशी लढण्यातही किती उपयोगी पडतात हे दिसून आले आहेत.
  3. कोरोना काळात मी आठवड्यातून एक दोन वेळा माझ्या आईला फोन करतो. ती प्रत्येक वेळा विचारते, हळद खातो आहेस ना ?
  4. भारत जेवढा जास्त फिट राहील तेवढा जास्त हिट होईल. आम्ही स्वतःला तंदुरूस्त ठेवतो तेव्हा आमचा आत्मविश्‍वासही कमालीचा उंचावतो.
  5. कोरोना काळात अनेकजणांनी सहकुटुंब व्यायाम मोहीमा राबविल्या.
  6. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका यासारख्या अनेक देशांनी महामारीच्या काळात व्यायाम व तंदुरूस्तीच्या व्यापक मोहीमा राबविल्या.
  7. "तुझे नाव व काम दोन्ही विराट आहे,' अशी दाद पंतप्रधानांनी कोहलीला दिली.
  8. आपण काहीही केले तरी लोक टीका करतात असे का, या सोमण यांच्या प्रश्‍नाला मोदींनी, "निंदकाचे घर असावे शेजारी'  या म्हणीचा दाखला दिला व आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता फक्त कामावर लक्ष द्यावे, असेही सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com