मोदी सरकारकडून पद्मश्री जाहीर, पण शरीफ चाचा वर्षभरानंतरही वंचित... - Modi government announces Padma Shri but Mohammad Sharif is deprived even after a year | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारकडून पद्मश्री जाहीर, पण शरीफ चाचा वर्षभरानंतरही वंचित...

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

मागील २८ वर्षांपासून मोहम्मद शरीफ हे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

अयोध्या : बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे ८५ वर्षांचे मोहम्मद शरीफ यांच्या कामाची दखल घेऊन मोदी सरकारने २०१९ त्यांना पद्मश्री जाहीर केला. त्यांना टीव्हीवरूनच ही बातमी कळाली. त्याचा आनंदही त्यांनी साजरा केला. पण वर्षभरानंतरही त्यांना अजून पद्मश्री देण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून कोरोनाचे कारण सांगितले जात आहे.

मोहम्मद शरीफ हे शरीफ चाचा म्हणून प्रसिध्द आहेत. मागील २८ वर्षांपासून ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांच्या मुलाचा २८ वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत मृत्यू झाला होता. पोलिसांनी या मुलाचे अंत्यसंस्कार बेवारस असल्याचे समजून केले. तेव्हापासून शरीफ चाचांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही धर्माची व्यक्ती असली तरी त्या धर्माच्या रीतीरिवाजानुसार ते अंत्यसंस्कार करत आले आहेत. 

शरीफ चाचा यांच्या या सामाजिक कार्याची दखल केंद्र सरकारनेही घेतली. त्यामुळे त्यांना २०१९ मध्ये पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पण अद्याप त्यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. सध्या शरीफ चाचा आजारी असून त्यांच्याकडे औषधांसाठीही पैसे नाहीत. वर्षभरापर्यंत त्यांना फारसे कोणी ओळखतही नव्हते. दोन खोल्या असलेल्या भाडोत्री घरात ते राहतात. 

हेही वाचा : धक्कादायक - भाजपचा तो पदाधिकारी बांग्लादेशीच...

त्यांच्या ७६ वर्षीय पत्नी बिब्बी म्हणाल्या, ''च्यावर खूप कर्ज आहे. स्थानिक सावकार आणि औषध दुकानदारांचे खूप देणे आहे. पद्मश्री अद्याप मिळालेला नाही. कोरोनामुळे पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.'' त्यांचा मुलगा मोहम्मद सगीरच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी ३१ जानेवारीला आम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाचे पत्र आले. त्यामध्ये पद्मश्रीची कल्पना देण्यात आली होती. मी वडिलांना शुभेच्छाही दिल्या. 

आम्हाला दिल्लीहून फोन आला तेव्हा राष्ट्रपती भवनमध्ये पुरस्कार घेण्यासाठी या, असे सांगण्यात आले होते. माझ्या वडिलांनी २५०० रुपये उधारीवर घेऊन रेल्वे तिकीट आरक्षित केले. पण शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अजून आम्ही तिकीटाचे पैसेही परत करू शकलो नाही, असे शरीफ चाचा यांच्या मुलाने सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख