ममतादीदी देणार धक्का; भाजपमध्ये गेलेले आमदार परतीच्या वाटेवर? - MLAs Who Joined BJP Meet CM Mamata Banerjee | Politics Marathi News - Sarkarnama

ममतादीदी देणार धक्का; भाजपमध्ये गेलेले आमदार परतीच्या वाटेवर?

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

निवडणुकीच्या तोंडावर तृणमुल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले काही आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

कोलकता : निवडणुकीच्या तोंडावर तृणमुल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेले काही आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या आमदारांपैकी दोघांनी नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बंगालमधील राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. बंगालमधील निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. भाजप व तृणमुलने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. ममता दीदींना शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तृणमुलचे आमदार फोडून भाजपमध्ये प्रवेश करून घेतला जात आहे. 

2019 ची लोकसभा निवडणूक झाल्यापासून आतापर्यंत तृणमुलचे 18 आमदार भाजपमध्ये आले आहेत. त्यामध्ये सुवेंदू अधिकारी व आणखी काही मंत्र्यांचाही समावेश आहे. सुवेंदु अधिकारी व राजीव बॅनर्जी या दोघांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. मात्र, इतर 16 जणांनी आमदारकी सोडलेली नाही. तृणमुलमधील एक खासदारही भाजपमध्ये गेले आहेत. तसेच काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय (एम) या पक्षांचा प्रत्येकी एक आमदार भाजपमध्ये गेला आहे. 

भाजपने दिलेल्या धक्क्यांमधून सावरण्याचा प्रयत्न ममतादीदींकडून केला जात आहे. त्यातच भाजपमध्ये गेलेले विश्वजित दास आणि सुनिल सिंग या दोन आमदारांनी मंत्रालयात जाऊन ममतांची भेट घेतली. या भेटीवरून ममतांच्या राजकीय खेळीवर चर्चा सुरू झाली आहे. आमदारांची घरवापसी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या दोन आमदारांनी ही भेट मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात होती, असे सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्ही उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासनही दिल्याचे ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनीही या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची कल्पना त्यांनी आधीच दिली होती. मुख्यमंत्र्यांना आमदार नेहमीच भेटत असतात, असे घोष यांनी नमुद केले.

भाजपच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून बंगालमध्ये रथ यात्रेचे आयोजन केले आहे. या रथेयात्रेला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मंगळवारी सुरूवात झाली. यावेळी बोलताना त्यांनी तृणमुल काँग्रेसवर जोरदार टीका केली. संस्कृती, विकासासह आणि देशाला दिशा देणारे राज्य म्हणून बंगालची ओळख होती. पण ममता सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राज्याचे आर्थिक शोषण झाले. ही बाब लोकांसमोर पोहचविण्यासाठी परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख