बंगालमध्ये भाजपची खेळी; केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेचे तिकीट - Minister MPs Drafted For west Bengal assemblly election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

बंगालमध्ये भाजपची खेळी; केंद्रीय मंत्री, खासदारांना विधानसभेचे तिकीट

वृत्तसंस्था
रविवार, 14 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी भाजपने उमेदवार देतानाही डावपेच टाकले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत एक केंद्रीय मंत्री व खासदारालाही तिकीट देण्यात आले आहे. 

तृणमूल काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून टप्प्याटप्याने उमेदवारांची नावे घोषित केली जात आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरूण सिंह यांनी आज बंगालमधील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे २७ व ३६ उमेदवारांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांना टॉलीगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

हेही वाचा : झुकणार नाही, लढणार! ममतांनी व्हीलचेअरवर बसून फुंकले रणशिंग

तसेच खासदार लॉकेट चॅटर्जी, स्वपन दासगुप्ता आणि निशित प्रमाणिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. बाबूल सुप्रियो हे पर्यावरण राज्यमंत्री आहे. ते गायक म्हणूनही प्रसिध्द असून बंगालमधील चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचे ठिकाणी असलेल्या टॉलीगंज मतदारसंघातूनच त्यांना तिकीट देण्यात आले आहे. 

चॅटर्जी याही अभिनेत्री असून त्यांना चुंचुरा मतदासंघातून तर स्वपन दासगुप्ता यांना तारकेश्वर आणि प्रमाणिक यांना दिनहाता मतदारसंघातून उतरविण्यात आले आहे. तृणमूलमधून भाजपात आलेले राजीव बॅनर्जी यांना डोमजुर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तसेच अभिनेता यश दासगुप्ता यालाही तिकीट देण्यात आले आहे. अर्थतज्ज्ञ अशोक लाहिरी यांनाही निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. 

भाजपकडून आज तमिळनाडूतील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अभिनेत्री खुशबू सुंदर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. आसाममधील १७ उमेदवारांची यादीही आज जाहीर करण्यात आली. तर केरळमधील ११२ उमेदवारांची यादी पक्षाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज व्हीलचेअरवर बसून रोड शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जखमी असले तरी निर्भिडपणे लढणार असल्याचा इशारा दिला. जखमी वाघ अधिक आक्रमक होतो, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.  

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख