वादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री तोंडघशी: मागावी लागली जाहिर माफी

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत.
वादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री तोंडघशी: मागावी लागली जाहिर माफी
Meenakshi Lekhi.jpg

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी (Farmers Movement) बोलताना गुरुवारी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांची जीभ घसरली. त्यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख 'मवाली' असा करत हिणवले होते. या प्रकरणी आता त्यांनी माफी मागितली आहे. दरम्यान, गुरूवारपासून शेतकऱ्यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले आहे. (Meenakshi Lekhi apologized for that statement) 

मीनाक्षी लेखी यांनी माफी मागताना शेतकरी संसददरम्यान प्रसारमाध्यमांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीमधील जंतर मंतरमध्ये कृषी कायद्यांविरोधात आयोजित आंदोलनादरम्यान वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता. पत्रकार परिषदेदरम्यान २६ जानेवारीला लाल किल्ला येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणि शेतकरी संसदरम्यान पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माझे मत विचारण्यात आले होते. त्या प्रश्नावर उत्तर देताना मी शेतकरी नाही तर फक्त मवाली अशा गोष्टी करु शकतात असे म्हटले होते, असे स्पष्टीकरण लेखी यांनी दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून यामुळे शेतकरी किंवा अन्य कोणी दुखावले असेल तर मी माफी मागते आणि माझे शब्द मागे घेते, असे त्या म्हणाल्या आहेत.

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला जवळपास आठ महिने झाले असले तरी अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही. पण तिन्ही कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे. कोरोना काळातही अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनात सहभागी होत आहेत. तर गुरूवारपासून या शेतकऱ्यांनी संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन सुरू केलं आहे. अधिवेशन सुरू असेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. 

या आंदोलनाविषयी मीनाक्षी लेखी यांना गुरूवारी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी 'त्यांना शेतकरी का म्हणता, ते मवाली आहेत मवाली,' असं म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये लेखी यांनाही स्थान मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलनाविषयी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. 

लेखी यांच्या या वक्तव्यावर बोलताना शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी संयमी भूमिका घेतील. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, मवाली नाही. देशभरातून आलेले शेतकरी दिल्लीच्या सीमांवर अहिंसक मार्गाने आंदोलन करत आहेत, असे टिकैत यांनी सांगितले. 

दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी २०० शेतकरी आजपासून दररोज जंतरमंतरवर प्रतिरूप संसद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी लेखी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुढील आंदोलनादरम्यान या वक्तव्याचे पदसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. टिकैत यांनी संयमी भूमिका घेतली असली तरी इतर शेतकरी संघटनांकडून अद्याप त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in