भाजपच्या खासदाराला दुसऱ्या पत्नीपासून कन्यारत्न...  - manoj tiwari recently baby girl with second wife  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या खासदाराला दुसऱ्या पत्नीपासून कन्यारत्न... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

माझ्या घरी आता एक लहान परी आली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.

नवी दिल्ली  : प्रसिध्द भोजपुरी अभिनेता, भाजपचे खासदार मनोज तिवारी यांना दुसरी पत्नी सुरभी यांच्यापासून कन्यारत्न झाले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट सॊशल मीडियावर पोस्ट केली आहे. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिवारी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये तिवारी म्हणतात, ''माझ्या घरी आता एक लहान परी आली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आय एम ब्लेस्सेंड विथ अ बेबी गर्ल...जय जगदंबे.''

मोठ्या मुलीच्या सांगण्यावरुन केले दुसरे लग्न 

मनोज तिवारी यांनी 2012 मध्ये पहिली पत्नी राणी यांच्याशी घटस्फोट घेतला होता. मनोज व राणी यांना जीया ही एक मुलगी आहे. राणी आणि मनोज यांनी 2012 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच एका मुलाखती दरम्यान मनोज तिवारी यांनी दुसरी पत्नी सुरभि याबद्दल मोकळेपणाने भाषण केले. त्यांनी सांगितले की, सुरभि आणि माझं लग्न एप्रिलमध्ये लॉकडाउन दरम्यान झालं होतं. ती माझी प्रशासकीय कामे सांभाळत असे. वास्तविक, ती एक गायिका आहे आणि तिने माझ्याबरोबर एका गाण्याच्या व्हिडिओमध्ये काम केलं आहे. माझी मुलगी जियाने सुरभीबरोबरच्या नात्यावर जोर धरला आणि सांगितले की आम्ही दोघांनी लग्न केले पाहिजे. जिया आणि सुरभि यांच्यातील नाते खूप चांगले आहे. 

ज्यावेळी मनोज यांनी ही गोड बातमी देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली, तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या गेल्या. मनोज तिवारी यांची मोठी मुलगी जिया सध्या मुंबई येथे शिक्षण घेत आहे. तिला भेटायला ते नेहमीच मुंबईला जात असतात. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा 
सिंहने मनोज तिवारी यांना मुलगी झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. तिनं इस्टाग्रामवर याविषयीची पोस्ट शेयर केली आहे. 

मनोज तिवारी यांनी 2013 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2014 मध्ये त्यांनी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यात त्यांनी काँग्रेसचे जयप्रकाश अग्रवाल यांचा पराभव केला होता. ते दिल्ली भाजपचे अध्यक्ष झाले. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा उत्तरपूर्व दिल्लीतुन निवडणूक लढविली. त्यात ते विजयी झाले. मनोज तिवारी एक प्रख्यात अभिनेता आहेत. ते कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. त्यांचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख