काय सांगता? ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना अर्धा तास ताटकळत ठेवलं! - Mamata Banerjee Kept PM Modi Waiting for half an hour | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

काय सांगता? ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना अर्धा तास ताटकळत ठेवलं!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 28 मे 2021

पश्चिम बंगालमधील निवडणुकांमधील वाद अद्याप संपले नसल्याचे हे चिन्ह आहे. 

कोलकता : यास वादळाने झालेल्या चक्रिवादळाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र  मोदी (PM Narendra Modi) यांना तेथील मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी  अर्धा  तास  वाट  पाहायला  लावली. पंतप्रधान यायच्या आधी मुख्यमंत्री उपस्थित असणे राजशिष्टाचारनुसार आवश्यक असताना त्याविरोधी कृती ममता यांनी केली.

त्या आल्या पण  त्या पंतप्रधानांसोबत फक्त पाच मिनिटे उपस्थित होत्या. नुकसानीचे निवेदन पंतप्रधानांच्या हातात दिले आणि त्या लगेच निघाल्या. तेथील मुख्य सचिव त्या बैठकीत सादरीकरण करणार होते. मात्र त्यांनाही हाताला ओढून घेऊन त्या घेऊन गेल्या. या साऱ्या घटनांवरून मोठा राजकीय धुरळा उडाला आहे.

यावरून संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath singh) यांनी ट्विट  करत  ममतांवर टीका केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेवरून ममता यांच्यावर टीका केली. तेथील राज्यपाल जगदिप धनकर यांनी हा काळा दिवस असल्याचे म्हटले. या प्रसंगानंतर केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. तेथील मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय यांना दिल्लीतील सेवेत बोलावून घेण्यात आले आहे. ते तेथे मुख्य सचिव म्हणून काम पाहू शकणार नाहीत, अशी व्यवस्था केंद्राने केली आहे. त्यासाठीचे आदेश आज रात्री उशिरा जारी केले. 

पश्चिम बंगालमध्ये वादळाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करण्यासाठी  आले, तेव्हा हा प्रकार घडला. खरे तर ममता या पंतप्रधानांना भेटणार की नाही, याचीच उत्सुकता होती. कारण मोदी यांच्यासोबतच्या बैठकीला तेथील विरोधी पक्षनेते आणि ममता यांचे राजकीय विरोधक सुवेंदु अधिकारी यांनाही निमंत्रण होते. त्यावरून ममता चिडल्या होत्या.  त्यामुळेच त्या उशिरा दाखल झाल्याचे सांगण्यात येते.

कलाईकुंड येथे या दोघांची ही भेट झाली. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मी पंतप्रधानांना दिली आणि त्यानंतर मी पुढील ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले, असे ममता यांनी ट्विटद्वारे कळविले आहे. पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो मात्र त्यांनी शेअर केेलेला नाही. मोदी यांनी पण ममता यांच्यासोबतचा फोटो शेअर केलेला नाही. मात्र ओऱिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो मोदींनी शेअर केला आहे. 

 

या घटनेनंतर राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लिहिले की पश्चिम बंगालची आजची घटना धक्कादायक आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान व्यक्ती नसून संस्था आहेत.  दोघांनीही जनसेवेची  शपथ घेतली आहे. संकटाच्या काळात पश्चिम बंगालला मदत करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांना अशी वागणूक देणे हे वेदनादायक आहे. जनसेवेचा संकल्प आणि संवैधानिक जबाबदाऱ्यांपेक्षा वैयक्तिक आणि पक्षीय मतभेद हे वरचढ चढल्याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे. भारतीय संघराज्याच्या भावनेला ठेच पोहचविणारी घटना आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

यास वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या दैाऱ्यावर होते. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  बैठकीचे आयोजन केले आहे होते. या बैठकीला भाजपचे नेते शुभेंद्रु अधिकारी यांना मोदींनी निमंत्रित केल्याने मुख्यमंत्री ममता बनर्जी भडकल्या होत्या. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. त्या आल्या पण अर्धा तास उशिराने! आणि लगेच निघून गेल्या. 

वाचा ही बातमी : पुण्यातील दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी सुरू राहणार

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख