अमेरिकेच्या व्हिसा धोरणातील हे बदल भारतीय विद्यार्थ्यांना फायद्याचे - major changes in us visa policy will benefit indian student | Politics Marathi News - Sarkarnama

अमेरिकेच्या व्हिसा धोरणातील हे बदल भारतीय विद्यार्थ्यांना फायद्याचे

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मे 2020

अमेरिकेने अस्थलांतरितांसाठीच्या व्हिसा धोरणात मोठा बदल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. हे बदल भारतीय विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहेत. 

वॉशिंग्टन : विशेष कौशल्य असलेल्या अस्थलांतरीत व्हिसा धोरणात मोठे बदल करण्यासाठी अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांत आज विधेयक मांडण्यात आले. अमेरिकेतच उच्च तंत्र शिक्षण घेतलेल्या व्यावसायिकांना एच १ बी व्हिसा देण्यास प्राधान्य देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. याचा अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

एच-१ बी अँड एल -१ व्हिसा रिफॉर्म अॅक्ट असे या नव्या कायद्याचे नाव असून यामुळे प्रथमच अमेरिकेच्या नागरिकत्व विभागाला एच १ बी व्हिसा देताना प्राधान्यक्रम ठरविता येणार आहे. अमेरिकेतच शिकलेल्या विदेशातील हुशार विद्यार्थ्यांना, अति उच्च शिक्षण घेतलेल्या आणि विशेष कौशल्य असलेल्या लोकांना व्हिसा देताना प्राधान्य मिळावे, हा यामागील उद्देश आहे. या कायद्याद्वारे अमेरिकी नागरिक आणि व्हिसाधारक या दोघांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा विधेयक सादर करताना करण्यात आला. 

 

 

प्रस्तावित कायद्यातील प्रमुख तरतुदी 

- अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्या विदेशी नागरिकांना व्हिसा देताना प्राधान्य 
- अमेरिकी नागरिकांना हटवून त्यांच्या जागी व्हिसाधारकांना नोकरी देता येणार नाही 
- व्हिसाधारकांना नोकरी देताना अमेरिकी नागरिकांच्या हिताला धक्का देता येणार नाही 
- प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने बोलावणाऱ्या कंपन्यांना आळा घालणे 
- कंपनीत पन्नासहून अधिक एच१ बी किंवा एल १ व्हीसाधारकांना नोकरी देण्यास मनाई 
- नियमभंग करणाऱ्या कंपन्यांची चौकशी आणि कारवाई करण्याचे कामगार विभागाला अधिकार 
- व्हिसाधारक कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कामाच्या स्वरूपाची सविस्तर माहिती ठेवणे कंपन्यांना बंधनकारक 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख