महात्मा गांधींची नात भेटली शेतकऱ्यांना, म्हणाल्या... - Mahatma Gandhis Granddaughter Tara Gandhi Visits Farmers Protest | Politics Marathi News - Sarkarnama

महात्मा गांधींची नात भेटली शेतकऱ्यांना, म्हणाल्या...

वृत्तसंस्था
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

गाझीपूर सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या 84 वर्षीय नात आणि राष्ट्रीय गांधी संग्रहालयाच्या अध्यक्ष तारा गांधी भट्टाचार्य आज गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांना भेटल्या. "मी कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी आलेले नाही. ज्यांनी आयुष्यभर आम्हाला अन्नधान्य दिले, त्या शेतकऱ्यांना भेटायला आले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. 

गाझीपूर सीमेवर दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतरही शेतकऱ्यांना जगभरातून पाठिंबा वाढत चालला आहे. विरोधी पक्षातील अनेक खासदारांनी गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना समर्थन दिले. आज महात्मा गांधी यांच्या नात असलेल्या तारा गांधी भट्टाचार्य यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

हेही वाचा : माजी सरन्यायाधीशांचे न्यायव्यवस्थेवर खडे बोल...

यावेळी तारा गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, मी इथे तुमच्यासाठी प्रार्थना करायला आले आहे. आम्ही गांधी संस्थेशी जोडलो आहोत. पण गाझीपूर सीमेवर कोणत्या राजकीय पक्षासाठी अजिबात आलेलो नाही. ज्या शेतकऱ्यांमुळे आज आम्ही जिवंत आहोत, त्या शेतकऱ्यांना भेटायला आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी हितातच देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे हित आहे. ही क्रांतीची भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठीची पहिली क्रांती 1857 मध्ये मेरठ येथूनच सुरू झाली होती. इतक्या दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन अद्बुत आहे, असे त्यांनी नमूद केले.

या आंदोलनातून शेतकऱ्यांना केवळ हितच जपले जावे, असे वाटते. शेतकऱ्यांनी केलेल कष्ट कुणापासूनही लपलेले नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे. इतक्या दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची दखल घ्यावी, असे आवाहनही तारा गांधी यांनी केले. शेतकऱ्यांना हिंसा करण्याची अजिबात गरज नाही, असेही त्या म्हणाल्या.

भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी यावेळी तारा गांधी यांचे स्वागत केले. टिकैत यांच्याकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तसेच सरकारने बैठकीची पुढची तारीख कळवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. पण अद्याप सरकारकडून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख