मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सत्तावापसीचे स्वप्न भंगले 

भाजपला सत्ता टिकविण्यासाठी फक्त 8 जागांची आवश्‍यकता होती. परंतु जवळपास 19 जागा भाजपने जिंकल्या आहेत.
In Madhya Pradesh, the dream of the Congress to return to power was shattered
In Madhya Pradesh, the dream of the Congress to return to power was shattered

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसोबत 11 राज्यांमधील विधानसभांच्या 59 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने 39 जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. मध्य प्रदेशात हातचे सरकार गमावणाऱ्या कॉंग्रेसला पोटनिवडणुकांमध्येही सत्तावापसी करता आलेली नाही.

तुलनेने ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने आणि छत्तीसगडमध्ये सत्ताधारी कॉंग्रेसने आपापल्या जागा टिकवून ठेवल्या. मात्र, हरियाना आणि तेलंगणमध्ये सत्ताधाऱ्यांना या पोटनिवडणुकीमुळे धक्का बसला आहे. 

पोटनिवडणुकांमध्ये निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाण्याची परंपरा राहिली आहे. यंदाच्या पोटनिवडणुकाही याला अपवाद राहिलेल्या नाहीत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी 22 आमदारांसोबत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर आणखी कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिल्याने या सर्व 28 जागांवर पोटनिवडणूक झाली.

विद्यमान सत्ताधारी भाजपला सत्ता टिकविण्यासाठी फक्त 8 जागांची आवश्‍यकता होती. परंतु जवळपास 19 जागा भाजपने जिंकल्या आहेत. अलिकडेच कॉंग्रेसमध्ये दिग्विजयसिंह गटाचे मानले जाणारे आणि अलीकडेच भाजपमध्ये येऊन मंत्रिपद मिळवलेले एदलसिंग कन्साना, ज्योतिरादित्य शिंदे गटाचे राज्यमंत्री गिरिराज दंडोतिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. कॉंग्रेसने 8 जागा राखून शिंदे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी या निराशाजनक निकालामुळे नेतृत्वबदलाची मागणी पुढे येऊ शकते. 

गुजरातमध्येही कॉंग्रेस आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने आठ जागांवर निवडणुका झाल्या. या आठही जागा भाजपने खिशात घातल्या आहेत. गुजरातमध्ये संघटनात्मक ताकद वाढल्याचे दावे कॉंग्रेसकडून केले जात होते. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार राजीव सातव हे कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी आहेत. मात्र येथे सत्ताधारी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावून कॉंग्रेसला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. 

कर्नाटकमध्येही दोन जागांवर मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने 7 पैकी पाच जागा राखल्या आहेत, तर दोन जागा जिंकून समाजवादी पक्षाने विधानसभेतील आपले बळ वाढविले आहे. 

दुसरीकडे, झारखंडमध्ये सत्ताधारी जेएमएम कॉंग्रेस आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. ओडिशामध्ये देखील नवीनबाबूंची जादू अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. बिजू जनता दलाने येथील दोन्हीही जागा आपल्याकडेच राखल्या आहेत. मणिपूरमध्ये पाचपैकी भाजपने चार जागा खिशात घालून ईशान्य भारतातही आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेजारच्याच नागलॅन्डमध्ये अपक्षांनी दोन्हीही जागा जिंकल्या आहेत.

हरियानामध्ये मात्र मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला विधानसभा पोटनिवडणुकीत आपली एक जागा गमवावी लागली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे बरोदा मतदार संघात भाजपचे उमेदवार होते. त्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराने चीतपट केले आहे. 

छत्तीसगडमध्ये एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसने विजय मिळवला. परंतु, तेलंगणमध्ये मात्र के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्र समितीला झटका बसला आहे. विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत येथे भाजपने विजय मिळवला. 

दरम्यान, बिहारच्या वाल्मिकीनगर लोकसभा मतदार संघाचीही पोटनिवडणूक झाली होती. येथेही नितीशकुमार यांचा करिष्मा कायम राहिला असून जदयूच्या उमेदवाराने कॉंग्रेसचा पराभव केला आहे. 

पोटनिवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे 

छत्तीसगड : 01 जागा- कॉंग्रेस विजयी 
गुजरात : 8 जागा- सर्व जागांवर भाजप विजयी 
हरियाना : 1 जागा- कॉंग्रेस विजयी 
झारखंड : 2 जागा - कॉंग्रेस आणि जेएमएम विजयी 
कर्नाटक : 2 जागा - दोन्ही ठिकाणी भाजप विजयी 
मध्यप्रदेश : 28 जागा- भाजप 19, बसप 1, कॉंग्रेस 8 
मणिपूर : 5 जागा- भाजप 4, अपक्ष 1 
नागालॅन्ड : 2 जागा- अपक्ष विजयी 
ओडिशा : 02 जागा- दोन्ही जागांवर बिजू जनता दलाचा विजय 
तेलंगण : 01 जागा- भाजप विजयी 
उत्तर प्रदेश : 07 जागा - भाजप 05, समाजवादी पक्ष 2 जागांवर विजयी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com