आता स्टॅलिन देणार गांधी अन् नेहरूंना आदेश; तमिळनाडूत नवे सरकार - M k stalin takes oath as tamilnadu chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

आता स्टॅलिन देणार गांधी अन् नेहरूंना आदेश; तमिळनाडूत नवे सरकार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 मे 2021

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी सकाळी स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी आज शपथ घेतली. ते आज पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. त्यांच्यासोबत 34 सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण मंत्रीमंडळातील मंत्र्यांच्या नावावरून आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हे मंत्रीमंडळ पहिल्याच दिवशी चर्चेचा विषय बनले आहे. (M k stalin takes oath as tamilnadu chief minister)

राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी सकाळी स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांनी 34 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये आर. गांधी यांच्याकडे खादी ग्रामोद्योग आणि के. एन. नेहरू यांच्याकडे नगरपालिका प्रशासन ही खाती देण्यात आली. या दोन मंत्र्यांच्या नावांमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. आता गांधी आणि नेहरू यांना स्टॅलिन यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. तर विधानसभा अध्यक्षांना गांधी व नेहरूंना बोलताना थांबवावे लागेल, अशी चर्चा होत आहे.

हेही वाचा : द्रमुक अन् अण्णाद्रमुकमधील दुश्मनीचा अस्त होणार? स्टॅलिन पर्व सुरू

एम. के. स्टॅलिन यांचे पूर्ण नाव मुथुवेल करूणानिधी स्टॅलिन आहे. सोव्हियत संघ यूनियनचे प्रसिध्द नेते जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरून एम. के. स्टॅलिन यांचे आले आहे. करूणानिधी यांच्या निधनानंतर स्टॅलिन हे 2018 मध्ये डीएमकेचे अध्यक्ष बनले. त्यापूर्वी त्यांचे मोठे बंधू अलगिरी यांच्यासोबत त्यांचा राजकीय संघर्ष झाला होता. त्यातून अलगिरी यांना पक्षातून काढण्यात आले.

स्टॅलिन यांच्या मंत्रीमंडळामध्ये समावेश करण्यात आलेले आर. गांधी हे 1996 मध्ये पहिल्यांदा डीएमकेकडून रानपेट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्यासर कुटूंबावर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा आरोप होता. न्यायालयाने त्यांना पुरावे नसल्याने मुक्त केले आहे. 

के. एन. नेहरू हे डीएमकेचे मुख्य सचिव आहेत. त्यांनी तिरूची पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणूक लढवली होती. त्यांचे वडील काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याविषयीही त्यांना खूप आदर होता. त्यामुळे त्यांचे नाव नेहरू आहे. 1989 मध्ये पहिली निवडणूक लढल्यानंतर के. एन. नेहरू डीएमकेचे एक आधारस्तंभ बनले आहेत. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख