नवी दिल्ली : ट्रक्टर मोर्चादरम्यान लाल किल्ल्यावरील ध्वजस्तंभावर धार्मिक झेंडा फडकवणाऱ्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी काही शेतकरी नेत्यांना लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त केले जात आहेत. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत हे आंदोलन यापुढेही सुरूच ठेवण्यावर ठाम आहेत.
दिल्ली हिंसाचाराचा तपास पोलिसांनी विशेष शाखेकडे सोपविला आहे. लाल किल्ला व दिल्लीच्या विविध भागांतील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत १९ लोकांना अटक करण्यात आली असून २५ हून जास्त गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. हिंसाचारात ३९४ पोलिस जखमी झाल्याचे दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांना अराजकता पसरविण्याच्या गुन्ह्याखाली कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून मेधा पाटकर, दर्शन पाल, योगेंद्र यादव, राजिंदरसिंग, बूटा सिंग व बलबीर सिंग राजेवाल आदी ३७ शेतकरी नेत्यांविरुद्ध समयपूर बादली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील काहींना भारताबाहेर जाण्याची परवानगी नाकारून त्यांना लुकआऊट नोटीसही (एलओसी) बजावण्यात आली आहे.
लाल किल्ल्यावरील दोन कलश गायब
लाल किल्ला हा ऐतिहासिक व प्राचीन स्मारकांच्या यादीतील वास्तू असल्याने येत्या ३१ जानेवारीपर्यंत तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच लाल किल्ल्यावरील आंदोलनादरम्यान दोन ऐतिहासिक कलश गायब झाल्याचा दावाही विभागाकडून करण्यात आला आहे.
गाझीपूर सीमेवर प्रचंड तणाव...
गाझीपूर सीमेवरील तंबू हटविण्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरवात केली आहे. कोशंबी येथे आंदोलकांना हटविण्यासाठी किमान ६० ते ७० बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यूपी गेट भागातही पोलिस व निमलष्करी दलाच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. गाझीपूरमधील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची तयारी उत्तर प्रदेश प्रशासनाने दाखविली आहे.
आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांची तयारी
दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी पोलिस मुख्यालयात वरिष्ठ अधिकारी व गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. गाझीपूरसह अन्य सीमांवरील आंदोलन संपविण्याच्यादृष्टीने पोलिसांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. आज रात्रीच काही सीमा खुल्या करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे समजते. त्यादृष्टीने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.
Edited By Rajanand More

