नितीश कुमारांचे वादळ पासवानांच्या पक्षावर... 'चिराग' बुझने लगा... - LJP leader join JDU and attacks on chirag paswan | Politics Marathi News - Sarkarnama

नितीश कुमारांचे वादळ पासवानांच्या पक्षावर... 'चिराग' बुझने लगा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

नितीशकुमार यांनी आक्रमकपणे पक्ष विस्तारासाठी पावले उचलली असून रामविलास पासवान यांचे पुत्र व लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांना मोठा दणका दिला आहे. 

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता नितीशकुमार यांनी आक्रमकपणे पक्ष विस्तारासाठी पावले उचलली असून रामविलास पासवान यांचे पुत्र व लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांना मोठा दणका दिला आहे. 

चिराग पासवाना यांच्यामुळे जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. एलजेपीने राज्यभरात भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते मात्र, जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी पक्ष सोडून लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेडीयू उमेदवारांच्या निवडणूक लढवली होती. याचबरोबर चिराग पासवान यांनी सातत्याने नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. याचाच वचपा काढत नितीश कुमार यांनी पासवान यांच्या पक्षाचे  १८ जिल्हाध्यक्ष आणि पाच प्रदेश महासचिवांसह २०८ नेत्यांना फोडले.

काही दिवसांपूर्वीच एका आमदारानेही पक्ष सोडला असल्याने पासवान यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या नेत्यांचा आज जेडीयुच्या पाटणा येथील कार्यालयात पक्षप्रवेश झाला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह उपस्थित होते. जेडीयुमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये केशव सिंह यांचाही समावेश आहे. त्यांनीच सर्वात आधीत लोक जनशक्ती फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी चिराग पासवान यांच्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. 

केशव सिंह म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीआधी चिराग यांनी पक्षाकडे दोन लाख रुपये जमा करणाऱ्यांना तिकीट दिले जाईल, असे म्हटले होते. पण जेव्हा निवडणूक आली तेव्हा भाजपच्या नेत्यांना तिकीट दिले. पक्षाला २० वर्ष देणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी धोका दिला, असा आरोप केशव सिंह यांनी केला होता. 

दरम्यान, बिहारमधील बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार जामा खान यांनी काही दिवसांपूर्वीच जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर अपक्ष आमदार सुमंतसिंह आणि लोक जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमारसिंह यांनीही जेडीयुमध्ये प्रवेश केला आहे. यापुढेही पासवान यांच्या पक्षातील आणखी नेते जेडीयुमध्ये येतील, असा दावा केला जात आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख