लालू प्रसाद यादव ४२ महिन्यानंतर उद्या कारागृहातून बाहेर पडणार... - Lalu Prasad Yadav Will Release Soon From Jail | Politics Marathi News - Sarkarnama

लालू प्रसाद यादव ४२ महिन्यानंतर उद्या कारागृहातून बाहेर पडणार...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

लालू प्रसाद 23 डिसेंबर 2017 पासून कारागृहात आहेत.

रांची : चारा गैरव्यवहार प्रकरणी कारागृहात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री, राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना १७ तारखेला जामिन मंजूर झाला आहे. यानंतर ते आता दोन दिवसात कारागृहाच्या बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   

चारा गैरव्यवहारातील दुमका कोशागारातून अवैधरीत्या पैसे काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यांना झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश कुमारसिंह यांनी नुकताच जामीन मंजूर केला. मात्र न्यायालयीन कामकाजात वकील सहभागी न झाल्याने ते बाहेर येऊ शकले नाहीत. 

बार काउंसिल आँफ इंडिया (बीसीआय)च्या आदेशानुसार लालू प्रसाद यादव यांचे वकील प्रभात कुमार यांनी आज न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे १० लाख रुपये जामिनाची रक्कम भरली आहे. त्यामुळे उद्या लालू प्रसाद यादव यांची सुटका होऊ शकते. बीसीआयने बुधवारी हा निर्णय घेतला. ‘बीसीआय’चे संयुक्त सचिव अशोक कुमार पांडेय यांनी राज्याच्या बार कौन्सिलला पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. आज हमीपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली तर उद्या त्यांची सुटका होऊ शकते. 

बीसीआयच्या या आदेशामुळे जामिन मंजूर झालेल्या अन्य कैद्यांनाही ही प्रक्रिया करुन बाहेर पडता येणार आहे. कोरोनामुळे वकील  हे न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे ही कार्यवाही पूर्ण होऊ शकत नव्हती. बुधवारी बीसीआयने घेतलेला निर्णय राज्यातील बार कौन्सिलला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती बीसीआयचे संयुक्त सचिव अशोक कुमार पांडेय यांनी सांगितले. त्यांनी राज्याच्या बार कौन्सिलला पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे झारखंड बार कैान्सिलचे वकील या प्रक्रियेत वकील सहभागी न झाल्याने ही प्रक्रिया अपूर्ण होती.  

कारगृहाच्या निरीक्षणाखाली असणारे लालू प्रसाद यादव सध्या दिल्ली येथे एम्स रुग्णालयात उपचार घेत आहे. जामिनाची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना डॅाक्टरांच्या सल्लानुसार पाटना किंवा अन्य ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यांना काही दिवस अजून रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येईल, अशी शक्यता आहे.

लालू प्रसाद 23 डिसेंबर 2017 पासून तुरूंगात आहेत. त्यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आलं आहे. अनेक आजारामुळे  लालूंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित असलेल्या दुमका कोषागार प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टाने लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. 
  
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीलालूंची बाजू मांडली होती. ''सीबीआय जाणूनबुजून लालूंना तुरुंगातून बाहेर येण्यास मज्जाव करत आहे. त्यांची केस विनाकारण लटकवण्याचं काम सुरू आहे,'' असं सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं होतं.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख