The laborer told Rahul Gandhi that "hunger is a bigger crisis than corona." | Sarkarnama

राहुल गांधींना ते म्हणाले, "कोरोनापेक्षा भूक मोठं संकट आहे." 

संपत मोरे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 23 मे 2020

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात राहुल गांधी या मजुरांच्या जवळ बसून त्यांच्या व्यथा समजून घेताना दिसत आहेत. 

पुणे : "आमच्यापुढे कोरोनापेक्षा भुकेच संकट मोठं आहे," अशा भावना उत्तरप्रदेशात परत जाणाऱ्या मजुरांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या. राहुल गांधी यांनी रस्त्याने जाणाऱ्या मजुरांच्या तांड्याला भेट देऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मजुरांना अनेक प्रश्न विचारले. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात राहुल गांधी या मजुरांच्या जवळ बसून त्यांच्या व्यथा समजून घेताना दिसत आहेत. 

राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सध्या देशभर चर्चेत आहे. राहुल गांधी यांनी मजुरांना प्रश्न विचारून बोलते केले आहे. "लॉकडॉउन अचानक जाहीर झाल्याने आमची अवस्था खूप बिकट झाली. आमचे खूप हाल झाले. श्रीमंत लोक घरात बसून जगू शकतात पण आमचे हातावर पोट आहे. आम्हाला काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही. आम्ही एका जागेवर बसलो आणि कामाला गेलो नाही तर आमची उपासमार होणार," असे राहुल गांधी यांना मजूर सांगताना दिसत आहेत.

"सरकारने काय केले पाहिजे?" असे राहुल गांधीं यांनी विचारताच, "काहीही नको. आम्हाला आमच्या गावी नेऊन सोडले पाहिजे." यावर सरकारने अजून काय करावे? असे गांधी यांनी विचारल्यावर"आम्हाला काम द्या" असे मजूर म्हणत आहेत. "मोदी सरकार हे गरिबांचे सरकार नाही. ते गरीबाच्या साठी काही करू शकत नाही," असे मजूर म्हणत आहेत.
"आम्हाला परत येताना पोलिसांनी मारले पण लोकांनीही मारले" अशी तक्रार ते राहुल गांधी यांना सांगत आहेत.

सरकार आणि प्रशासनाबाबत रोष

राहुल गांधी अतिशय शांतपणे संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मजूर देत असतानाच एका क्षणी एक महिला बोलता बोलता गहिवरून गेली आहे. "सरकार आणि प्रशासन याबाबतचा रोष व्यक्त करत असतानाच मजूर त्यांना कोणत्या प्रसंगातून जावे लागले याची माहिती राहुल गांधी यांना देत आहेत. "कोरोना पेक्षा भूक आमच्यासाठी मोठं संकट आहे." अस हे मजूर सांगत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख