डी. के. शिवकुमारांना शह देण्यासाठी कुमारस्वामी-येडियुरप्पांची भेट ?

20 महिने मुख्यमंत्रिपद उपभोगलेल्या कुमारस्वामी यांनी उर्वरित 20 महिने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता.
Kumaraswamy met Chief Minister Yeddyurappa
Kumaraswamy met Chief Minister Yeddyurappa

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यात राजकीय विळ्या-भोपळ्याचे वैर असूनही हे दोन्ही नेते शुक्रवारी भेटले. गेल्या काही महिन्यांतील त्यांच्या भेटीची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान कावेरी येथे त्यांची भेट घेतली. 2011 मध्ये सत्ता वाटणीच्या कराराचा भंग झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकाविरोधात कडवट भूमिका घेतली होती. 20 महिने मुख्यमंत्रिपद उपभोगलेल्या कुमारस्वामी यांनी उर्वरित 20 महिने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता. अलीकडच्या काळात दोन्ही नेते किमान तीनदा भेटले आहेत. 

गेल्या विधानसभा अधिवेशनात कॉंग्रेसने सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावात धजदने (जनता दल धर्मनिरपेक्ष) भाग घेतला नाही. कॉंग्रेस पक्ष एकाकी पडल्याने अविश्वास ठराव बारगळला होता. कुमारस्वामी यांच्या रामनगर मतदारसंघातील विकास योजनांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मोठ्या प्रमाणात अनुदान मंजूर केले. धजदने इतर विकासात्मक योजनांचाही फायदा करून घेतला आहे. 

डी. के. शिवकुमार हे वक्कलीग नेते असल्याने राज्यातील वक्कलीग समाजाची मते कॉंग्रेसकडे वळतील, अशी भीती कुमारस्वामींना वाटते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कुमारस्वामींनी कॉंग्रेस आणि शिवकुमार यांच्यावर टीका करण्याची संधी कधीच गमावली नाही.

सन 1999 मध्ये एस. एम. कृष्णा, वक्कलीग मुख्यमंत्री असताना धजदच्या बाजूने असलेल्या वक्कलीगांनी कॉंग्रेसचे समर्थन केले होते. या पाठिंब्याच्या पुनरावृत्तीची चिंता धजदला आहे. अशा परिस्थितीत कुमारस्वामी यांच्या पाठिंब्याने येडियुरप्पा यांना पुन्हा बळकटी मिळणार आहे. येडियुरप्पांच्या भाजपांतर्गत विरोधकांनाही त्यामुळे वचक बसणार आहे. 

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या भेटीमागे विशेष अर्थ नाही. मंड्या डीसीसी बॅंक निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी कुमारस्वामी यांनी भेट घेतली होती. या शिवाय अन्य कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही. या भेटीला वेगळा अर्थ लावणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी या भेटीनंतर सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com