मुख्यमंत्र्यांवर आरोप झाले अन् पोलिसांनी नोंदवला 'ईडी'वरच गुन्हा

सोने तस्करी प्रकरणात मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा कट रचल्याचा आरोप ईडीच्या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
Keral police Crime Branch has registered a case against ED officials
Keral police Crime Branch has registered a case against ED officials

तिरुअनंतपुरम : केरळमधील सोने तस्करी प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात गोवण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ईडी आणि पोलिस आता आमनेसामने आले आहेत. 

मागील वर्षी ५ जुलै रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ व सीमा शुल्क विभागाने तिरूअनंतपुरम विमानतळावर १४ कोटी रुपयांचे ३० किलो सोने जप्त केले होते. हे सोने संयुक्त अरब अमरातीमध्ये पाठविले जाणार होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्वप्ना सुरेश हिला अटक केली आहे. तिच्या चौकशीमध्ये मुख्यमंत्री विजयन यांचे प्रधान सचिव एम. शिवशंकर यांचा स्वप्ना सुरेशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना पदावरून हटवत निलंबित करण्यात आले.

सीमा शुल्क विभागाने ५ मार्च रोजी केरळ उच्च न्यायालयात थेट मुख्यमंत्री विजयन, त्यांचे तीन मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना सोन्याची तस्करीबाबत माहिती होती, असा दावा केला. स्वप्ना सुरेश हिने आपल्या जबाबात थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेतल्याने देशभरात खळबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावरच सोने तस्करीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव आल्याने डाव्या आघाडीच्या अडचणी वाढल्या विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वप्ना सुरेशची एक अॉडिओ क्लपी समोर आली. त्यामध्ये तिने ईडीचे अधिकारी आपल्याला मुख्यमंत्र्यांविरोधात जबाब देण्यास सांगत असल्याचा दावा केला आहे.  तसेच ईडीकडून स्वप्ना सुरेशची चौकशी सुरू असताना तिथे हजर असलेल्या सिजी विजयन या महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट ईडीवर आरोप केले. स्वप्ना सुरेशवर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यासाठा ईडीने दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला. मागील वर्षी १२ व १३ अॉगस्ट रोजी ईडीने स्वप्ना सुरेशची चौकशी केली होती. 

या प्रकारामुळे राज्य सरकारने ईडीविरोधात पावले टाकण्यात सुरूवात केली होती. अखेर आज केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने ईडी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कट रचणे, धमकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. स्पप्नाशी संबंधित अॉडिओ क्लीपची चौकशी केल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधिक्षक ई. एस. बिजुमोन यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने ईडी व पोलिस आमनेसामने आले आहेत. केरळ पोलिसांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या या घडामोडींमुळे केरळमधील राजकारण चांगलेच तापले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com