पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन पण झाली केवळ 'मन की बात' - Jharkhand Chief Minister Hemant Soren criticizes Prime Minister Narendra Modi | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन पण झाली केवळ 'मन की बात'

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 मे 2021

गुरुवारी संध्याकाळी उशिरा सोरेन यांनी हे ट्विट केले आहे. त्यानंतर हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.

नवी दिल्ली :  देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील वादही मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत आहेत. त्याच वेळी पंतप्रधानांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत (Hemant Soren) सोरेन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेवेळी मोदींनी स्वत:चीच 'मन की बात'ची टेप लावली होती, अशी टीका सोरेन यांनी केली आहे. ( Jharkhand Chief Minister Hemant Soren criticizes Prime Minister Narendra Modi)

त्या बाबत हेमंत सोरेन यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, ''आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचे ऐकले असते तर फार बरे झाले असते, असा टोला सोरेन यांनी लगावला आहे. 

हे ही वाचा : प्राधिकरण विलिनीकरणातून अजितदादांनी केली लांडगे, जगतापांची नाकेबंदी

गुरुवारी संध्याकाळी उशिरा सोरेन यांनी हे ट्विट केले आहे. त्यानंतर हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणासहित अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी कोरोना संकटावर चर्चा केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांसोबतची बैठक लाईव्ह केली होती. त्यावर पंतप्रधानांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना माफी मागावी लागली होती.

हे ही वाचा : लॅाकडाऊननंतर पहिला ठोक मोर्चा बीडमध्ये; मग राज्यभरात आंदोलन उभे करु

दरम्यान, झारखंडने कोरोनाचे संकट निर्माण झालेले असतानाही केंद्र सरकारकडून मदत झाली नसल्याचा आरोप केला आहे. आरोग्य सचिव अरुण सिंह यांच्या मते, राज्याला केवळ 2181 रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळाले आहेत. राज्य सरकार बांगलादेशाकडून 50 हजार रेमडेसिव्हिर मागवू इच्छिते, मात्र केंद्र सरकारने अद्याप मंजुरी दिली नाही. याशिवाय झारखंडमध्ये लसीचे संकटही वाढले आहे. त्यामुळेच झारखंडमध्ये अद्याप 18 वर्षांवरील युवकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले नाही. झारखंडने अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. मात्र, आता झारखंडलाच ऑक्सिजनच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख