दिलासादायक : बोगद्यात अडकलेल्या 16 जणांना मिळालं जीवनदान... - ITBP rescues 16 people trapped inside Tapovan tunnel in uttarakhand | Politics Marathi News - Sarkarnama

दिलासादायक : बोगद्यात अडकलेल्या 16 जणांना मिळालं जीवनदान...

वृत्तसंस्था
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

चमोली जिल्ह्यातील तपोवन जवळील बोगद्यात काही लोक अडकले आहेत. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांकडून (आयटीबीपी) त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

डेहराडून : हिमकडा कोसळून नद्यांना आलेल्या पूरामुळे 100 ते 150 जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पूरामुळे चमोली जिल्ह्यातील तपोवन जवळील बोगद्यात काही लोक अडकले आहेत. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांकडून (आयटीबीपी) त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 16 जणांना वाचविण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

चमोली जिल्ह्यातील जोशी मठमधील रेनी गावाजवळ आज हिमकडा कोसळला. त्यामुळे परिसरात महापूर आला आहे. अलकनंदा व धौलीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचनाक मोठ्या प्रमाणावर वाढली. नदीव ऋषिगंगा उर्जा प्रकल्पाचे काम सुरू होते. नदीला आलेल्या पूरामुळे हा प्रकल्प उध्वस्त झाल्याची माहिती आहे.

प्रकल्पामध्ये काम करत असलेल्या कामगार या पूरात वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, सीडीआरएफ, आयटीबीपी च्या टीम घटनास्थळी पोहचल्या आहेत.

या पुरामुळे तपोवन धरणाजवळील बोगद्यात काम करत असलेले अनेक मजूर अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याशी संपर्कही होत नाही. 'आयटीबीपी'च्या जवानांनी अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत 16 जणांना वाचविल्याची माहिती आहे. बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दगड-माती वाहून आल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

तपोवन परिसरातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या कामाच्या ठिकाणाहून 9 ते 10 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुमारे 100 ते 150 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प जवळपास उध्वस्त झाला आहे. येथील सुमारे 50 जण बेपत्ता आहेत. ते सर्व मजूर असून त्यांचाही शोध सुरू आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजीव गौबा यांनी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रत्येकाला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

संपूर्ण देश उत्तराखंडसोबत : पंतप्रधान मोदी

उत्तराखंडमध्ये घडलेल्या घटनेवर सातत्याने लक्ष असून संपूर्ण भारत उत्तराखंड सोबत आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी देश प्रार्थना करत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून एनडीआरएफच्या बचाव कार्याची माहिती घेत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर गृहमंत्री अमत शहा यांनीही उत्तराखंडला सर्व प्रकारची मदत केली जात असल्याचे सांगितले. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख