तमिळनाडूत दलित सरपंचाचा अवमान; नितीन राऊतांनी लिहिले राज्यपालांना पत्र  - Insult to Dalit sarpanch in Tamil Nadu; Nitin Raut wrote a letter to the Governor | Politics Marathi News - Sarkarnama

तमिळनाडूत दलित सरपंचाचा अवमान; नितीन राऊतांनी लिहिले राज्यपालांना पत्र 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

सरपंच श्रीमती राजेश्वरी एस. या दलित असल्याने त्यांना इतर सदस्यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारू दिले नाही.

मुंबई : तमिळनाडूमध्ये दलित सरपंचांचा अवमान करणारा उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या अन्य सदस्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. 

तमिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील थेरकू ग्रामपंचायतीत हा प्रकार घडल्याचा व्हिडिओ नुकताच समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला होता. भविष्यात अशा घटना घडू नयेत, या साठी ऍट्रोसिटी कायद्यातील कलमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे दलितांविरुद्ध होणारा भेदभाव दूर करण्यासाठी सामाजिक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणीही राऊत यांनी तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

या ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती राजेश्वरी एस. या दलित असल्याने त्यांना इतर सदस्यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारू दिले नाही. तसेच, उपसरपंच मोहन राजन व अन्य सदस्य खुर्च्यांवर बसले होते. मात्र, सरपंचांना जमिनीवर बसण्यास फर्माविण्यात आले. या सर्व घटना व्हिडिओमध्ये चित्रित झाल्या असून या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणातील दोषी सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. 

सरपंच या दलित असल्याने असा भेदभाव करण्यात आला आहे. त्या गेल्या वर्षी आरक्षित गटातून सरपंच झाल्यानंतर त्यांना ध्वजवंदनही करू दिले नाही, अशीही माहिती असल्याचे ऊर्जामंत्री राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे. सामाजिक भेदभाव आणि अस्पृश्‍यतेविरुद्ध कायदे असूनही तमिळनाडूत अजूनही जात पाहिली जाते, हे वेदनादायक आहे. 

तमिळनाडूत अजूनही सामाजिक भेदभाव मोठ्या प्रमाणावर पाळला जातो. उच्चवर्णीय समाज दलितांवर निर्बंध लादून लोकशाहीने दिलेल्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवतो. हे अयोग्य असल्याने याबाबत विविध पातळ्यांवर उपाय योजना करावी, अशीही विनंती त्यांनी राज्यपाल पुरोहित यांना केली आहे. 

Edited By vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख