अनेक ठिकाणी लशीचा खडखडाट अन् अमित शहा म्हणतात...

आज देशात अनेक ठिकाणी लोकांना लस मिळत नसल्याची स्थिती आहे.
The information on vaccine shortage is not right says Amit shah
The information on vaccine shortage is not right says Amit shah

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लशींचा तुटवडा जाणवत आहे. लशींअभावी लसीकरण केंद्र बंद करावी लागली असून नागरिकांना केंद्रांवरून परत जावे लागत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रातून लशींचा कमी पुरवठा होत असल्याचे म्हटले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देशात कुठेही तुटवडा नसल्याचा दावा केला होता. पण आज देशात अनेक ठिकाणी लोकांना लस मिळत नसल्याची स्थिती आहे.

मुंबईतील सर्वात मोठे बीकेसी येथील कोविड लसीकरण केंद्र आज लस नसल्याने बंद ठेवावे लागले आहे. तसेच नागपूर, पिंपरी चिंचवडसह राज्याच्या अनेक भागातील केंद्रांवर लस नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत. ही केवळ महाराष्ट्रातीलच स्थिती नसून गुजरात, छत्तीसगढ, झारखंड, दिल्ली यांसह अन्य काही राज्यांमध्ये लशीअभावी काही केंद्र बंद करावी लागली आहेत. 

देशात अनेक ठिकाणी ही स्थिती असताना गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्ष वर्धन यांचीच री ओढली आहे. लशींच्या तुटवड्याची माहिती चुकीची आहे. सर्व राज्यांना पुरेशा लशी पुरविल्या जात आहेत, असा दावा शहा यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. 

दरम्यान, काल टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखविल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी आकडेवारी समोर मांडली. त्यामध्ये त्यांनी राज्यात 6 टक्के लशी वाया जात असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना टोपे यांनी जावेडकर यांच्यावर टीका केली होती. 'लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा,' असे प्रत्युत्तर टोपे यांनी दिले.

काल रात्री जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याला कालपर्यंत 1 कोटी 6 लाख 19 हजार 190 डोस पुरविण्यात आले आहेत. त्यापैकी 90 लाख 53 हजार 523 डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. त्यापैकी 6 टक्के म्हणजे 5 लाखांहून अधिक डोस वाया गेले आहेत. तर 7 लाख 43 हजार 280 डोस मिळतील. सध्या सुमारे 23 लाख डोस उपलब्ध आहेत, असा दावा जावडेकर यांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील अनेक लसीकरण केंद्र लशींअभावी बंद करावी लागल्याची स्थिती आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com