एक्झिट पोल : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे तेजस्वी यादवच दावेदार - india today axis media exit poll says tejashwi yadav is peoples choice for cm | Politics Marathi News - Sarkarnama

एक्झिट पोल : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे तेजस्वी यादवच दावेदार

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले आहे. एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांनाच मुख्यमंत्रिपदासाठी पसंती मिळाली आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभेसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान आज झाले असून, एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. राज्यात त्रिशंकू स्थिती होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आघाडीवर राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज झालाअसून, यात ७८ मतदारसंघ होते निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत चिराग पासवान हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख