भारतातील तब्बल साडेपाच कोटी नागरिक 'लसवंत' - India crosses 5.5 cr COVID vaccination mark | Politics Marathi News - Sarkarnama

भारतातील तब्बल साडेपाच कोटी नागरिक 'लसवंत'

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

देशात आतापर्यंत तब्बल साडेपाच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून गेल्या 24 तासात 23 लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

नवी दिल्ली: भारतात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढल्याचे चित्र दिसत असतानाच एक सुखद बातमीही येऊन धडकली आहे. देशात आतापर्यंत तब्बल साडेपाच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून गेल्या 24 तासात 23 लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली. साडेपाच कोटींपैकी 80 लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना पहिला डोस, 51 लाख आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना दुसरा डोस, 60 वयोगटाच्या पुढे असणाऱ्या 2 कोटी 47 लाख जणांचा व 45 वयोगटाच्या पुढे असणाऱ्या सुमारे 56 लाख जणांचा यामध्ये समावेश आहे. 

लसीकरणाला 69 दिवस पूर्ण झाले असून गेल्या 24 तासात दहा राज्यांमध्ये 70 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, देशातील कोरोनाच्या वाढत्या आकड्यांवर ही लस प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात देशात तब्बल 60 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 257 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड व गुजरात या पाच राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. 

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार मुंबईत कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्के आहे. 17 ते 23 मार्चदरम्यान कोरोनारुग्ण वाढीचा दर 0.79 टक्के आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा डबलिंग रेट 84 दिवसांवर आलाय. 39 अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. 432 इमारती सील करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. 

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा अॅलर्टवर आहेत. मुंबईत 8851 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. आयसीयू बेड्स 1559 तर 978 व्हॅन्टिलेटर बेड्स उपलब्ध आहेत, असे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख