'महाजाथ' सत्तेत आल्यास मुख्यमंत्री काँग्रेसचाच...  - If 'Mahajath' wins Assam polls, CM will be from Congress: Gaurav Gogoi | Politics Marathi News - Sarkarnama

'महाजाथ' सत्तेत आल्यास मुख्यमंत्री काँग्रेसचाच... 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 मार्च 2021

महाजाथ (alliance) विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्षाचाच असेल, अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी बुधवारी दिली.

आसाम: आसाममधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच पेटू लागले असून दररोज मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. आसाममधील विधानसभा निवडणुका २७ मार्चपासून तीन टप्प्यात होत असून मतमोजणी २ मे रोजी होईल. महाजाथ (alliance) विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्षाचाच असेल, अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी बुधवारी दिली. गोगोई म्हणाले, महाजाथअंतर्गत आसाममध्ये काँग्रेसने सर्वाधिक जागा लढविल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री नव्हे तर मुख्यमंत्री हाच काँग्रेसचा असेल, हे निश्चित आहे. महाजाथमध्ये काँग्रेस हा सर्वात प्रबळ पक्ष आहे. महाजाथ भाजपच्या सीएएला विरोध करण्यासाठीच अंमलात आली. त्यामुळे महाजाथमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच अजिबात नसून परस्पर समन्वय आहे, असेही ते म्हणाले.  

गोगोई पुढे बोलताना म्हणाले, बंगालमध्ये भाजपने सीएए लागू करू असे जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. मात्र आसाममध्ये सीएए लागू होणार की नाही याबाबत स्पष्टता नाही. नागरिकांची दिशाभूल केली जात असून एका राज्यात तो लागू, दुसऱ्या राज्यात नाही असे कशाकरिता करायचे व त्याने काय साध्य होणार? आसाममध्ये सीएएबाबत स्पष्टता नसली तरीदेखील भाजप सत्तेवर आल्यास तो लागू होईलच, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, महाजाथ अंतर्गत आसाम प्रदेश काँग्रेस कमिटी, आॅल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया,  कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया लिबरेशन, एजीएम व बोडोलँड पिपल्स फ्रन्ट येतात. आसाममधील विधानसभा निवडणुकीत १२६ जागांसाठी २७ मार्चपासून लढत होत असून तीन टप्प्यात ते होईल. तर मतमोजणी २ मे रोजी होणार आहे. २०१६ मध्ये भाजपने आसाममध्ये काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकत विजयी होत सत्ता स्थापन केली होती. यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख