"यावेळी मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही..." - I will not contest the Assembly elections this time said Gupteswar Pandey | Politics Marathi News - Sarkarnama

"यावेळी मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही..."

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

मी आय़ुष्यभर बिहार जनतेची सेवा करीन. मला फोन करू नका. बक्सर ही माझी जन्मभूमी आहे.

नवी दिल्ली :  बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे बक्सर येथून विधानसभा निवडणूक लढण्यास तयार होते. पण त्यांना संयुक्त जनता दलात (जेडीयू) आणि भाजप यांच्याकडून तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे पांडे हे नाराज आहेत. गुप्तेश्वर पांडे यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे. "यावेळी मी विधानसभा निवडणूक लढविणार नाही," असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना जेडीयूकडून तिकिट देण्यात आलेलं नाही. गुप्तेश्वर पांडे यांनी नुकतंच डीजीपी पदाचा राजीनामा देत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र काल पक्षाने आपल्या कोट्यातील सर्व 115 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या यादीमध्ये  गुप्तेश्वर पांडे यांचं नाव नाही. बक्सरची जागा युतीमध्ये भाजपच्या खात्यात गेली असून भाजपकडून या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली आहे. यानंतर निराश झालेल्या गुप्तेश्वर पांडे यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

गुप्तेश्वर पांडे म्हणाले की मला शुभचिंतकाचे फोन येत आहे. त्यामुळे त्रस्त झालो आहे. मला त्यांच्या भावना समजत आहे. माझ्या सेवानिवृत्तीनंतर मी बिहार विधानसभेची निवडणूक लढवावी. पण या वर्षी मी निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे हताश, निराश होऊ नका. संयम राखा. माझं जीवन संघर्षमय गेलं आहे. मी आय़ुष्यभर बिहार जनतेची सेवा करीन. मला फोन करू नका. बक्सर ही माझी जन्मभूमी आहे. बक्सरवासीयांना मला शुभेच्छा आणि आशीवार्दाची गरज आहे. माझं आयुष्य बिहारसाठी समर्पित आहे. 

पांडे यांनी तिकिट देण्यात भाजपसमोर काही अडचणी आहेत. कारण स्थानिक पातळीवरील बंडखोरीचा मोठा फटका तेथे पक्षाला बसू शकतो. बक्सर हा भाजप खासदार अश्विनी चौबे यांचा बालेकिल्ला आहे. नितीशकुमार यांच्या निष्ठावंताला भाजपकडून उभे करण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. पांडे यांना तेथून तिकिट देणे चौबे यांना नंतर अडचणीचे ठरू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सुशांत मृत्यू प्रकरणात बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला होता. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरल्याचे चित्र होते.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुप्तेश्वर पांडे हे मूळचे बक्सरमधील आहेत. त्यामुळे त्यांना बक्सर भागातील बक्सर आणि ब्रह्मपूर या मतदारसंघांतून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेले आहेत. यामुळे पांडे यांचे तिकिट कापले गेले आहे. इतर मतदारसंघातून पांडे यांना तिकिट मिळण्याची आशा होती. मात्र, तेथून निवडणूक लढण्यास पांडे तयार नाहीत. पांडे हे आता भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी पाटण्यापासून दिल्लीपर्यंत हेलपाटे मारत होते. या दोनपैकी एका मतदारसंघातून तिकिट मिळवण्याचा आटापिटा पांडे यांच्याकडून  सुरू होता.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख