मी केलं ते योग्यच! लग्न उधळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी सुरू - I stand by whatever I did says DM shailesh kumar Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

मी केलं ते योग्यच! लग्न उधळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

पश्चिम त्रिपुराचे (Tripura) जिल्हाधिकाऱी शैलेश कुमार यादव यांची कारवाई सध्या देशभर गाजत आहे.

आगरतळा : लग्न समारंभांवर पोलिसांच्या फौजफाट्यासह छापा टाकणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आज त्यांनी चौकशी समितीसमोर आपले म्हणणे सादर केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण केलेली कारवाईच योग्यच असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी या कारवाईबाबत माफीही मागितली होती. 

पश्चिम त्रिपुराचे (Tripura) जिल्हाधिकाऱी शैलेश कुमार यादव यांची कारवाई सध्या देशभर गाजत आहे. अनेकांनी या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. तर काहींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे समर्थनही केले आहे. या वादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागत कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचे म्हटले आहे. या प्रकारानंतर त्यांना निलंबित करण्यात आले असून दोन सदस्यांची समिती चौकशीसाठी नेमण्यात आली आहे.

त्रिपुरा राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार यांनी दोन आयएएस अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये नगरविकास विभागाचे किरण गित्ते (Kiran Gitte) व आयएएस अधिकारी तनुश्री देववर्मा यांचा समावेश आहे. त्यांना चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या समितीने आज यादव यांची बाजू घेतली.

समितीला आपले म्हणणे सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना यादव म्हणाले, मी जे केले त्यावर ठाम आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे हे माझे काम आहे. मी माझे म्हणणे चौकशी समितीसमोर सादर केले आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले. 

काय केले शैलेश यादव यांनी?

पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी दोन दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात छाप टाकला होता. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटाही होता. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये शैलेश यादव हे अत्यंत रागात दिसत आहेत. कोरोनाचा प्रोटोकोल तोडला म्हणून ते लग्नात उपस्थित सर्वांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. त्यांनी नवरदेवाला धक्का मारून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच ज्येष्ठांनाही असभ्य भाषेत बोलत अपमानित करून बाहेर काढले. त्यांनी पोलिसांनाही अपशब्द वापरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

लग्नासाठी परवानगी घेतलेले पत्र यादव यांना दिल्यानंतर त्यांनी ते फाडून वऱ्हाडींच्या अंगावर फेकून दिले. या कारवाईत अडथळा आणल्याचे कारण पुढे करून काहींवर ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी तिथेच पोलिसांना दिले. जवळपास 30 जणांना त्यांनी ताब्यात घेतले. तसेच गुन्हाही दाखल केला. काही जणांवर पोलिसांनी लाठीहल्लाही केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख