नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील आजच्या भाषणात विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी वारंवार व्यत्यय आणला. तसेच काॅंग्रेसच्या इतर सदस्यांनीही शेती कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला. त्यावर माझ्या भाषणात व्यत्यय आणणे हे मोठे षडयंत्र आहे, असा पलटवार मोदींनी केला. जनतेपर्यंत सत्य जाऊ नये यासाठी वारंवार अडथळा आणला जात असल्यावरून मोदींनी चौधरी यांना टोमणेही मारले.
राष्ट्रपतींच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने भारताची संकल्प शक्ती दिसून आली. त्यांच्या अभिभाषणामुळे अनेकांमध्ये उर्जा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. चौधरी हे वारंवार जागेवर उभे राहून मोदींच्या भाषणातील मुद्यांवर आक्षेप घेत होते. त्यावरून सभापती ओम बिर्ला यांनीही त्यांना समज दिली. तरीही चौधरी यांची टोकाटोकी सुरूच होती. मी तुमचा खूप आदर करतो. तरी तुम्ही असे आज का वागत आहात, असाही सवाल मोदींनी त्यांना केला. सभागृहात काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित होते. `तुम्हाला ज्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे, ते काम माझ्यामुळे झाले आहे. मी तुमची आणखी किती सेवा करू`, अशीही तिरकस टिप्पणी मोदींनी केली.
काँग्रेससह विरोधी पक्षांनी कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली. मोदीच्या भाषणावेळी काळे कायदे मागे घ्या, अशा घोषणा देण्यात आल्या. भाषणावेळी विरोधकांनी सभात्याग केला. त्यावरून मोदींनी काॅंग्रेसला टोमणा मारला. राज्यसभेतील काॅंग्रेसचे नेते ऐकून भूमिका घेतात आणि लोकसभेतील नेते मात्र वेगळीच भूमिका घेत आहेत. काॅंग्रेसचे नेते गोंधळलेले आहेत. ते पक्षाचे आणि देशाचेही भले करू शकत नाही, अशी जळजळीत टीका मोदींनी केली. कृषी कायद्यांची भीती दाखवून जे होणार नाही त्याबद्दल धास्ती दाखवून कायद्यांच्याविरोधात वातावरण तयार केल्याचा आऱोप त्यांनी केला.
ते म्हणाले की सुरवातीला अध्यादेश आणि त्यानंतर संसदेत कृषी कायदे मंजूर करण्यात आले. नवे कायदे आणल्यामुळे कोणतीही बाजार समिती बंद पडलेली नाही. एमएसपी संपलेली नाही. विरोधक सत्य लपवत आहेत. कृषी सुधारणा देशासाठी महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. या कायद्याच्या विरोधातील सध्याची आंदोलने लोकशाहीत योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी आंदोलन पवित्र आहे पण हे आंदोलनजीवी हे आंदोलनाला अपवित्र करत असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला.

