मला एकट्याला जाऊन मोदींना भेटणं शक्य झालं असतं..पण..

मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे.
1collage_20_2872_29.jpg
1collage_20_2872_29.jpg

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात काल कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका पंतप्रधान मोदी स्पष्ट करत नाहीत. याविषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे. महापौर निलोफर आजरेकर यांनी याबाबतची भूमिका मांडली.

या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवरून एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात संभाजी राजे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे.

 
संभाजीराजे यांचे फेसबूकवरीव पत्र....

मी आज वर्तमानपत्रात बातमी वाचली, आणि मला आश्चर्य वाटले. मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून कोल्हापुर महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याच्या कारणावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो, आणि समाजाच्या वतीने तुम्हा सर्व नेतेमंडळींचे आभारही मानतो.

परंतु मला मोदीजींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे. गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात मी राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. तुमचे माझ्या विषयी चे प्रेम समजू शकतो, पण....

गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापुरातील हजारो कोटी रुपयांचा गॅस पाईपलाईन चा प्रकल्प महापालिकेच्या परवानग्या वाचून रखडलेला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात फार मोठी भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. या योजनेमुळे सर्व कोल्हापूरकरांचे भविष्य बदलून जाणार आहे. कोल्हापूर च्या सर्वांगीण विकासात ही योजना मैलाचा दगड ठरेल. आजच्या तहकूब झालेल्या सभेत या प्रकल्पाला परवानग्या देणं आवश्यक होतं.
तसेच,
कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम च्या टर्फ करीता 5.50 कोटी रुपये केंद्राकडून मी मंजूर करून आणलेत. तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान(टर्फ) बनणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मला समजते. त्या संदर्भातील परवानगी या महासभेत दिली असती तर मला आनंद झाला असता. कोल्हापुरातून आंतरराष्ट्रीय स्तराचे हॉकी खेळाडू तयार झाले पाहिजेत हे माझं स्वप्न आहे.

कोरोनाचा कोल्हापुरात सर्वाधिक प्रकोप वाढला आहे. त्यासाठी अधिक नियोजन करण्याची गरज आहे, त्यासंदर्भातील उपाय योजना या महासभेत केल्या असत्या तर त्या अधिक योग्य झाले असते. पण तुम्ही सर्वांनी ही महासभा माझ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या भेटीच्या संदर्भाला चुकीच्या पद्धतीने घेतले.

राहता राहिला मोदीजींच्या भेटी चा प्रश्न. आज पर्यंत मी जेव्हा केव्हा मोदीजींना वैयक्तिक भेटण्यासाठी गेलो तेंव्हा आमची भेट झालीच आहे. पण यावेळी माझी पंतप्रधानांना अशी मागणी होती की, महाराष्ट्रातील सर्व खासदारांना सोबत घेऊन भेट घ्यावी. पण कोविड मुळे एवढ्या सर्वांना एकत्र येणं धोक्याचं ठरण्याची शक्यता असावी. त्यामुळे त्यांना तशी वेळ देणं सध्या शक्य होत नसेल कदाचित.

मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. तुमच्या माझ्याविषयीच्या भावनेचा मी आदर करतो. आपण सर्व जण मिळून कोल्हापूर च्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहू. मराठा आरक्षणाला यश हे मिळणार आहेच. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com