'हम दो, हमारे दो' मधून राहुल गांधींना आपल्या कुटुंबाबद्दलच सांगायचं होतं...  - In Hum Do Hamare Do Rahul Gandhi wanted to tell only about his family | Politics Marathi News - Sarkarnama

'हम दो, हमारे दो' मधून राहुल गांधींना आपल्या कुटुंबाबद्दलच सांगायचं होतं... 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांनी टोला लगावला आहे.

नवी दिल्ली :  कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर काल टीकास्त्र सोडले. 'हा देश केवळ चारच लोक चालवत आहेत, 'हम दो, हमारे दो'. त्यांच्यासाठीच नोटाबंदीही करण्यात आली,' अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपचे खासदार गिरीराज सिंह यांनी टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी हम दो, हमारे दो मधून त्यांना गांधी कुटुंबाबद्दलच सांगायचं होतं टोला गिरिराज सिंह यांनी टि्वट केले आहे.  याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे. 

re>

गिरीराज सिंह म्हणतात की राहुल गांधी स्वत:, त्यांची आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या बहीणीचा पती यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबद्दल साधा एक शब्दही उच्चारला नाही. त्यांनी हम दो हमारे दो या जुन्या घोषणाचा संदर्भ त्यांनी स्वत:साठी दिला होता.    राहुल गांधी यांनी काल लोकसभेत कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने कृषी कायद्यांवर चर्चा होणार नसल्याचे सांगितले. पण मी आज केवळ कृषी कायद्यांवरच बोलणार असल्याचे सांगत राहुल यांनी मोदी व शाह यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणावर अनेकदा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मध्येच भाषण थांबवावे लागले.  राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान आक्रमक पवित्रा घेतला होता. ते म्हणाले, तिनही कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांमुळे शेतकरी उध्वस्त होतील. त्यांची जमीन भांडवलदारांना जाईल. मालाला रास्त भाव मिळणार नाही. बाजार समित्यांचे अस्तित्व संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. हा देश केवळ चार लोक चालवत आहेत. हे कायदेही त्यांच्यासाठीच आणण्यात आले आहेत, अशी टीका करत राहुल गांधी यांनी अंबानी व अदानी यांनाही लक्ष्य केले.  कृषी कायद्यांमुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त होईल. देशात नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत देशातील शेतकरी, मजूर व छोट्या व्यापाऱ्यांना कमजोर करण्याचा हा प्रयत्न नोटबंदीपासून सुरू झाला आहे. ही नोटबंदीही पंतप्रधानांनी 'हम दो हमारे दो'साठी करण्यात आली.  कृषी कायद्यांवरून सुरू असलेल्या आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नसून संपुर्ण देशाचे आहे. शेतकऱ्यांनी रस्ता दाखविला आहे. आता संपूर्ण देश एका आवाजात 'हम दो हमारे दो'च्या विरूध्द बोलेल. शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. आता तेच तुम्हाला हटवतील. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील, अशा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख