अमित शहा मैदानात; शेतकऱ्यांचे पाणी बंद, आंदोलन दडपण्याची तयारी - HM Amit Shaha in Active Mode against farmers protest | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहा मैदानात; शेतकऱ्यांचे पाणी बंद, आंदोलन दडपण्याची तयारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 जानेवारी 2021

शेतकरी मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने आंदोलन दडपण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने गृहमंत्री अमित शहा कमालीचे सक्रीय झाल्याचे आज सकाळपासून घडलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे.

नवी दिल्ली : शेतकरी मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने आंदोलन दडपण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने गृहमंत्री अमित शहा कमालीचे सक्रीय झाल्याचे आज सकाळपासून घडलेल्या घडामोडींवरून दिसून येत आहे. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी वाढविलेला पोलिसांचा फौजफाटा, काही भागात शेतकऱ्यांचे बंद केले पाणी, दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवरील रस्ते खुले करण्याचे सरकारने दिलेले आदेश, शेतकरी नेत्यांवर दाखल कऱण्यात आलेले गंभीर गुन्हे या घटनांमुळे शेतकरी आंदोलनाची धार बोथट करून ते संपविण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांकडून ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मोर्चाला हिंसक वळण मिळाल्याने सुमारे दोन महिने शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन संपविण्यासाठी सरकारने अन्य प्रयत्न केले. बैठकांमधून शेतकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण यश आले नाही. मात्र, हा हिंसाचार केंद्र सरकारच्या पथ्यावरच पडला आहे. या घटनेनंतर अमित शहा अचानक सक्रीय झाल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दिल्लीत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेत सूचना दिल्या. त्यानंतर दोन दिवसांत पोलिस व प्रशासनही तातडीने पावले उचलताना दिसले. 

अमित शहांकडून पोलिसांचे कौतुक

गृहमंत्री अमित शहा यांनी आज हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिसांची रुग्णालयांत जाऊन भेट घेतली. तसेच पोलिसांनी दाखविलेल्या संयमाचे त्यांनी कौतुकही केले. ''प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारावेळी पोलिसांनी दाखविलेले शौर्य आणि संयम कौतुकास्पद आहे. त्यांच्यावर देशाला गर्व आहे,'' असे ट्विट त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांचे हिंसाचाराबाबत एकही ट्विट नाही.

23 एफआयआर, 37 नेत्यांना नोटीस

हिंसाचारप्रकरणी दिल्लीत एकुण 23 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शेतकरी नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून त्यात राकेश टिकैत, योगेंद्र यादव, मेधा पाटकर यां्यासह 37 नेत्यांचा समावेश आहे. खुनाचा प्रयत्न, दंगल भडकविणे, कट रचणे असे गुन्हे आहेत. त्यांना नोटीस पाठविण्यात आली असून तीन दिवसांत खुलासा मागविला आहे. तसेच त्यांचे पासपोर्टही जप्त केल जाऊ शकतात.

सीमेवर पोलिसांचा फौजफाटा

दिल्लीच्या सिंघू, टिकरी, चिल्ला, गाझीपूर या सीमांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना परत जाण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. त्यामुळे आंदोलनातील काही शेतकऱ्यांनी परतीचा वाट धरली आहे. पोलिसांकडून बळाचा वापर केला जात नसला तरी पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीच्या सीमा खुल्या करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.

पाणी बंद केले

गाझीपूर सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला पाणीपुरवठा पोलिसांकडून बंद कऱण्यात आला आहे. तसेच फिरती स्वच्छतागृह हटविण्यासही पोलिसांकडून सुरूवात कऱण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उभारलेले टेंटही हटविले जात अाहेत.

आंदोलन थांबविण्याचे उत्तर प्रदेश सरकारचे आदेश

दिल्ली-उत्तरप्रदेशच्या सीमेवरील आंदोलन थांबविण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने गाझीपूर येथील आंदोलकांना नोटीस बजावून आंदोलनाचे ठिकाण सोडण्यास सांगितले. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी परतीची वाट धरली. आंदोलकांनी माघार न घेतल्यास प्रशासनाकडून बळाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. 

दिल्लीतील स्थानिक विरोधात

हिंसाचारानंतर आज दिल्लीतील अनेक स्थानिक नागरिक सिंघू सीमेवर जमा झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांनी परत जाण्याची घोषणाबाजी केली. तसेच दिल्ली पोलिसांचे कौतूक केले. त्यामुळे शेतकऱ्यांविरोधात वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. 

गोळ्या झेलण्यास तयार

केंद्र सरकारने जाणीवपुर्वक हिंसा घडवून आणल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. मोर्चाचा नियोजित मार्ग अडवून दिल्लीत जाणारे रस्ते खुले ठेवण्यात आले होते, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. भाजप आमदाराकडून धमकी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पण गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नसल्याचे टिकैत यांनी स्पष्ट केले.

नेत्यांना अटक होण्याची शक्यता

पुढील दोन-तीन दिवसांत दिल्लीच्या सीमा खुल्या न झाल्यास पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना अटक केली जाऊ शकते. पण या अटकेनंतर शेतकऱ्यांकडून विरोध वाढू शकतो. त्यामुळे चर्चेतून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना परत पाठवून आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख