रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी - Hindustani Awam Morcha Demands Probe in Ram Vilas Paswan Death | Politics Marathi News - Sarkarnama

रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी हिंदुस्थानी आवाम मोर्चाने केल्याने आता बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवाच वाद उफाळला आहे. पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबतचे पत्र थेट पंतप्रधानांना पाठविण्यात आले आहे

पाटणा : दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी हिंदुस्थानी आवाम मोर्चाने केल्याने आता बिहारमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवाच वाद उफाळला आहे. पासवान यांच्या मृत्यूची चौकशी करण्याबाबतचे पत्र थेट पंतप्रधानांना पाठविण्यात आले असून त्यांच्या मृत्यूबाबत पासवान यांचे पूत्र चिराग पासवान यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख व केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे आठ आॅक्टोबर रोजी निधन झाले. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र चिराग हे चालवत आहेत.  त्यांच्यावर आरोप करत हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते डाॅ. दानिश रिजवान यांनी पंतप्रधानांना उद्देशून हे पत्र पाठवले आहे. पासवान यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने त्यांचे मेडिकल बुलेटिन का प्रसिद्ध केले नाही, कुणाच्या सांगण्यावरून पासवान यांना भेटण्यासाठी केवळ तीन व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती, असे प्रश्न या पत्रात उपस्थित करण्यात आले आहेत.

पासवान यांच्या मृत्यूनंतर चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात चिराग पासवान हास्य विनोद करताना दिसून आले होते. त्यामुळे चिराग यांचे वागणे संशयास्पद असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी या पक्षाची स्थापना केली आहे. 

दरम्यान, चिराग पासवान यांनी या पत्राबाबत संताप व्यक्त केला आहे. एकाद्या दिवंगत व्यक्तीच्या मुलावर संशय घेताना त्यांना लाज वाटत नाही का, असा प्रश्न चिराग यांनी उपस्थित केला आहे. मी मांझी यांना माझ्या वडिलांच्या प्रकृतीची फोनवरुन माहिती दिली होती. पण त्यांनी साधे भेटायला येण्याचे सौजन्यही दाखवले नाही, असे चिराग यांनी म्हटले आहे. मांझी आज माझ्या वडिलांबाबत चिंता व्यक्त करत आहेत. पण माझे वडील रुग्णालयात होते तेव्हा त्यांनी अशी काळजी दाखवली नव्हती. आता मृत व्यक्तीला पुढे करुन राजकारण केले जात आहे, असा आरोप चिराग यांनी केला आहे. 

चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला आहे.  चिराग पासवान यांनी आज एक पत्र प्रसिद्ध करून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "माझे वडील आजारी असताना नितीशकुमार त्यांना पाहायला देखील आले नाही, आता आमच्याशी जवळीस साधण्याचे ढोंग करीत आहेत," असे चिराग यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख