भाजपचे सरकार संकटात; काँग्रेस पुदुच्चेरीचा वचपा हरयाणात काढणार...

शेतकरी आंदोलनावरून सरकारमधील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे.
Haryana Congress to move no confidence motion against government
Haryana Congress to move no confidence motion against government

चंदीगड : पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर आता हरयाणातील भाजपच्या सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हरयाणा सरकारविरोधात विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनावरून सरकारमधील अनेक आमदार नाराज असल्याने हरयाणा सरकार बहुमत सिध्द करू शकणार नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेस आघाडीतील पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने विधानसभेत सरकारला २२ फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. पण बहुमत गाठण्यासाठी १४ आमदारांचा आकडा काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी सभागृहात भाषण करून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. आता या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्रीय मंत्रीमंडळाने केली आहे. 

पुदुच्चेरीमधील सरकार पाडण्याचा भाजपचाच डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आता पुदुच्चेरीसह इतर राज्यांचा वचपा हरयाणामध्ये काढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. शेतकरी आंदोलनाचे निमित्त साधून हरयाणातील भाजप सरकारविरोधात विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हूडा यांनी ही माहिती दिली.

हूडा म्हणाले, सरकारला पाठिंबा दिलेले दोन आमदार सरकारमधून बाहेर पडले आहेत. काही आमदारांनी हे सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी असल्याची टीका केली आहे. सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे आम्ही विश्वासदर्शक ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हरयाणामध्ये एकुण ९० आमदार असून बहुमतासाठी ४६ आमदारांची गरज असते. भाजपकडे ४० आमदार असून त्यांनी जननायक जनता पक्षाच्या १० आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आहेत. पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात काँग्रेसचे ३१ आमदार आहेत. शेतकरी आंदोलनावरून चौटाला यांनी यापूर्वीच सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपमधीलही काही आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे खट्टर सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com