शहीद भगतसिंग यांच्या भाचीची शेतकरी आंदोलनात उडी

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टिकरी बॉर्डरवर येण्यासाठी हरयाणामधील हांसी येथून शेतकरी आंदोलकांनी पदयात्रा सुरु केली आहे.
Gurjeet Kaur .jpg
Gurjeet Kaur .jpg

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टिकरी बॉर्डरवर येण्यासाठी हरयाणामधील हांसी येथून शेतकरी आंदोलकांनी पदयात्रा सुरु केली आहे. शहीद भगत सिंग यांची भाची गुरजीत कौर यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी गुरजीत कौर म्हणाल्या सरकारला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात. विरोधी आवाज दाबण्याची संस्कृती आणि भ्रष्टाचाराचे बीज काँग्रेसनेच देशामध्ये पेरले. मात्र, सध्याचे सरकार लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सर्व मर्यादांचे उल्लंघन करत आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधला.

हांसीमध्ये शेकडो शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी पदयात्रेला पाठिंबा देण्यासाठी त्यामध्ये सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा २३ मार्चला क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली त्या शहीद दिनाच्या दिवशीच टिकरी बॉर्डवर पोहचणार आहे. पदयात्रा पहिल्यांदा सोरखी गावामध्ये थांबणार असून तेथील शेतकरीही या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. 

गुरजीत कौर यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे लोक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शांत झाले कारण त्यांना वाटले, त्यांनी त्यांच काम पूर्ण केले असून जे लोक देशाचा कारभार पाहण्यासाठी सत्तेत येणार आहेत ते इमानदार असतील. मात्र, तसे झाले नाही सत्ताधारी इमानदार निघाले नाहीत. देश चुकीच्या व्यक्तींच्या हाती गेला आणि दिवसोंदिवस भ्रष्टाचार वाढत गेला. कोणत्याच पक्षाच्या सरकारने जनतेचा विचार केला नाही. केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्ष स्पर्धा करताना दिसतात, असे गुरजीत कौर म्हणाल्या. 

शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना गुरजीत कौर यांनी २३ मार्चनंतर शेतकरी आंदोलन आणखीन जोमाने पुढे जाईल अशी माहिती दिली. २६ मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदचा परिणाम पहायला मिळेल. आता लोकांना सध्याच्या सरकारचा खोटारडेपणा कळू लागला आहे. हळूहळू लोकांचा भाजपवरील विश्वास उडत चालला आहे, अशी टीकाही गुरजीत कौर यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com