काल काँग्रेसला घरचा आहेर अन् आज मोदींचे कौतुक! गुलाम नबी आझाद म्हणाले...

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते.
Gulam Nabi Azad praises Pm Narendra Modi
Gulam Nabi Azad praises Pm Narendra Modi

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. यावेळी पंतप्रधानांनी आझाद यांचे तोंडभरून कौतुकही केले होते. तर आज आझाद यांनी मोदींचे कौतुक करत त्यांच्यांकडून काही शिकायला हवे, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे कालच आझाद यांचा समावेश असलेल्या 'जी-23' नेत्यांच्या गटाने एका कार्यक्रमात काँग्रेसला घरचा आहेर दिला होता. 

काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. 

आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर 'जी-23' नेत्यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षाला आठवण करुन दिली आहे. यासाठी निमित्त होते जम्मू-काश्मीरमध्ये आयोजित शांती संमेलनाचे. या संमेलनाला कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी, राज बब्बर आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. 

या संमेलनात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसने संसदेतून मुक्त केल्याबद्दल अनेक नेत्यांनी जाहीरपणे दु:ख व्यक्त केले. या वेळी बोलताना सिब्बल यांच्यासह अन्य काही नेत्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. पक्ष दुबळा होत चालल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. 

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना आझाद म्हणाले, नरेंद्र मोदी स्वत:ला गर्वाने चहावाला संबोधतात. माझ नरेंद्र मोदी यांच्यासोबत राजकीय मतभेद आहेत. पण पंतप्रधानाचे पाय जमिनीवर आहेत. आपल्या विनम्रता आणि लोकांना विसरून चालणार नाही. पंतप्रधान बनूनही मोदी आपले मूळ विसरलेले नाहीत. लोकांना त्यांच्याकडून हे शिकायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला.  

दरम्यान, काय संमेलनात बोलताना सिब्बल म्हणाले की, सत्य सांगायचे झाल्यास काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. याआधीही आम्ही एकत्र आलो होतो आणि पक्षाला भक्कम केले होते. आमचा आवाज हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. पक्ष पुन्हा भक्कम व्हावा, अशीच सगळ्यांची इच्छा आहे. नवीन पिढी पक्षाशी जोडली जायला हवी.आम्ही काँग्रेसचे चांगले दिवस पाहिले आहेत. आमचे जसजसे वय होत आहे तसा पक्ष दुबळा झालेला आम्हाला पाहायचा नाही. 

'जी-23'मधील आणखी एका नेता म्हणाला की,  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचे उल्लंघन सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. पक्षात अजून कोणत्याही सुधारणा अथवा बदल झालेले दिसत नाही.  

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com