भाजप आमदारांच्या भेटीनंतर राज्यपाल दिल्लीत; पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता - Governor Jagdeep Dhankhar will be meet Amit shah in New Delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

भाजप आमदारांच्या भेटीनंतर राज्यपाल दिल्लीत; पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

भाजपच्या 50 हून अधिक आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची नुकतीच भेट भेट घेतली आहे.

कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची गंभीर दखल राज्यपाल जगदीप धनखर यांनी घेतली आहे. राज्यातील कायदा-सुव्यस्थेच्या स्थितीचा ते सातत्याने आढावा घेत आहेत. त्यातच भाजपच्या 50 हून अधिक आमदारांच्या शिष्टमंडळाने त्यांची याच मुद्यावर भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपाल दिल्लीला रवाना झाले. त्यामुळं बंगालमध्ये चर्चेला ऊत आला आहे. (Governor Jagdeep Dhankhar will be meet Amit shah in New Delhi)

राज्यपाल दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यांना बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल ते सादर करतील, अशी चर्चा आहे. भाजपनेही हा मुद्या उचलून धरल्याने सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे. तृणमूल काँग्रेसनेच हा हिंसाचार घडवून आणल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ममतादीदींनी भाजपकडे बोट दाखविले आहे. 

हेही वाचा : आंबेडकर, खासदार माने आंदोलनात सहभागी...चंद्रकांत पाटलांनी दिलं पाठिंब्याचं पत्र

निकालानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून खून करण्यात आले. महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे अनेक गंभीर आरोप भाजपने केले आहेत. या हिंसाचारामध्ये तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या हिंसाचारानंतर राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांची बैठक घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक हिंसाचार झालेल्या भागाची पाहणीही करून गेले आहे. 

राज्यपाल धनखर यांच्याकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांनाही लक्ष्य केलं जात आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात लोकशाही श्वास घेऊ शकत नाही, असा आरोप केला आहे. राज्यातील स्थिती खूपच चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल काल रात्री दिल्लीत दाखल झाले. ता. 18 जूनपर्यंत ते दिल्लीतच राहणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली. 

दरम्यान, बंगालमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. तृणमूलमधून भाजपमध्ये दाखल झालेले अनेक नेते पुन्हा घरवापसी करत आहेत. त्यामुळे बंगाल भाजपमध्ये सध्या अस्वस्थता आहे. यापार्श्वभूमीवरही राज्यपालांची दिल्लीवारी महत्वाची मानली जात आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्र्यांसह ते भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भेटीत ते केंद्रीय नेतृत्वाला अहवाल देताना काय शिफारस करणार, याबाबत उत्सुकता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख