गोंधळी खासदारांना आवर घालण्यासाठी मोदी सरकार करतंय 'प्लॅनिंग'

पेगॅसस प्रकरण, तीन कृषी कायदे, कोरोना आदी मुद्यांवरून दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला होता.
Government will prepare a code of conduct for MPs in Parliament
Government will prepare a code of conduct for MPs in Parliament

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर मोदी सरकारनं गोंधळी खासदारांना आवर घालण्यासाठी 'प्लॅनिंग' सुरू केलं आहे. लोकसभा व राज्यसभेत खासदारांनी विरोध करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याबाबतची आचारसंहिता तयार केली जाणार आहे. (Government will prepare a code of conduct for MPs in Parliament)

पेगॅसस प्रकरण, तीन कृषी कायदे, कोरोना आदी मुद्यांवरून दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला होता. विरोधकांनी सरकारला धारेवर धरत कामकाजात सातत्यानं अडथळे आणले. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज जेमतेम काही तास झालं. या गदारोळातच सरकारनं चर्चेशिवायच बहुतेक विधेयक संमत करून घेतली. त्यावरूनही विरोधकांनी टीकेची झोड उठवली. तर सरकारकडून विरोधकांच्या गोंढळाकडं बोट दाखवण्यात आलं.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली. कामकाजात अडथळे आणणे, नियमांचे उल्लंघन करणे तेही वारंवार उल्लंघन करणे आणि त्याहीपुढे जाऊन सभागृहात आक्षेपार्ह वर्तन वारंवार करणे, हे सुदृढ लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही असे बिर्ला यांनी म्हटले आहे. त्यामुळं लोकशाहीचं सर्वोच्च मंदीर असलेल्या संसदेत लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्यावरही बंधने आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावित संसद सदस्य आचारसंहिता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातच अंमलात आणण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

सदस्यांनी निषेध नोंदवताना अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जावू नये, घोषणा फलक फडकवू नयेत, सभापतींच्या आसनाची झटापट करू नये या दृष्टीने नियम बनविले जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये सर्वपक्षीय खासदारांकडून मतं मागवण्यात येणार आहेत. ही सर्व कार्यवाही पारदर्शकपणे पार पाडली जाईल, असंही भाजपचं म्हणणं आहे. 

काय झालं होतं राज्यसभेत?

राज्यसभेत गोंधळात कायदे मंजूर करण्याच्या निषेधार्थ विरोधकांनी अखेरच्या तीन-चार दिवसात केलेल्या गदारोळाने मर्यादाही ओलांडली. काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांनी फाईल सभापतींच्या आसनावर फेकली. तर तृणमुल काँग्रेसच्या अर्पिता घोष यांनी दरवाजाला लाथ मारून काच फोडली. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हातातील कागद हिसकावून घेत हवेत भिरकावण्यात आले. अखेरच्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर प्रचंड संख्येने मार्शल बोलावले. हे लोक बाहेरचे असल्याचा आरोप विरोधकांनी केला. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारनं कसून प्रयत्न सुरू केले आहेत. संसद सदस्यांसाठीची प्रस्तावित आचारसंहिता हा त्याचाच एक भाग आहे. ही आचारसंहिता सर्वपक्षीय खासदारांनी मिळून बनवावी असं मत बिर्ला यांनी व्यक्त केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com