काँग्रेसला चार आमदारांचा 'दे धक्का'; या राज्यातील सरकार अल्पमतात... - The government of congress is in the minority | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसला चार आमदारांचा 'दे धक्का'; या राज्यातील सरकार अल्पमतात...

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राज्याच्या दौऱ्याआधीच सरकार अल्पमतात आल्याने पक्षावर नामुष्की ओढविली आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेसला धक्का बसला आहे. चार आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे पुदुच्चरीमधील सरकार अल्पमतात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राज्याच्या दौऱ्याआधीच सरकार अल्पमतात आल्याने पक्षावर नामुष्की ओढविली आहे.

तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी केली आहे. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता आहे. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार आहेत. तर डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता. 

काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आले आहे. काँग्रेसकडे आता ११ आमदार उरले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी पुदुच्चरीच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच आमदारांनी राजीनामे दिले. राज्यात सत्ता आल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी ते येणार असल्याचे समजते.

हेही वाचा : राम मंदिरासाठी निधी न देणाऱ्यांच्या घरावर वेगळ्या खुणा...

आमदार ए. नमासिव्यम आणि ई थीपप्पंजन यांनी २५ जानेवारीलाच राजीनामा दिला आहे. तर एका आमदाराने सोमवारी आणि एका आमदाराने मंगळवारी राजीनामा दिला. दरम्यान, राजीनामा दिलेले आमदार कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असल्याने चार आमदारांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याची पक्षाकडून जोरदार तयार सुरू आहे. पण या दौऱ्यावर आता सरकारच्या अल्पमताचे सावट राहणार असल्याने मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवली आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख


//