धक्कादायक : सरकारी रुग्णालयात बागकाम करणारा घेतोय कोरोनाचे स्वॅब - Gardner collectiong corona sample in government hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

धक्कादायक : सरकारी रुग्णालयात बागकाम करणारा घेतोय कोरोनाचे स्वॅब

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 एप्रिल 2021

काहीवेळा नागरिकच स्वत:च स्वॅब घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

भोपाळ : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. तसेच रुग्णालये, कोविड केअर सेंटर, कोरोना चाचणी केंद्र आदी ठिकाणी प्रशिक्षित कमर्चाऱ्यांचा तुटवडाही निर्माण झाला आहे. त्यामुळे एका चाचणी केंद्रावर बागकाम करणाऱ्या स्वॅब घेण्यासाठी नेमण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हा प्रकार भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील आहे. राज्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. पण महाराष्ट्राच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी येथील आरोग्य यंत्रणेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. राज्यात आताच कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला असून प्रशिक्षित कर्मचारी मिळत नाहीत.

सांची येथील सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. पण प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने याठिकाणी नागरिकांचे कोरोना स्वॅब घेण्यासाठी बागकाम करणाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हालके राम असे त्याचे नाव आहे. याविषयी विचारल्यानंतर तो म्हणाला,''मी बागकाम करतो. पण रुग्णालयात कंत्राटी कामगार आहे. रुग्णालयातील अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याने मी स्वॅब घेत आहे.''

गट वैद्यकीय अधिकारी राजश्री तिडके यांनी या प्रकाराचे समर्थन केले आहे. संबंधित बागकाम करणाऱ्याला प्रशिक्षित केल्याचे त्यांनी सांगितले. ''आम्ही काय करू? कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. पण कामही सुरू राहायला हवे. त्यामुळे आपत्कालीन उपाय म्हणून आम्ही अनेकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामध्ये बागकाम करणारेही आहेत,'' अशी हतबलता त्यांनी मांडली. 

विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने यावरून आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ''मागील आठ दिवसांत आरोग्यमंत्री फिरकले नाहीत. त्यांनी कोणती बैठकही घेतलेली नाही. या आठ दिवसांत ज्यांनी मंत्र्यांना इथे पाहिले असेल त्यांना मी 11 हजार 1 रुपयांचे बक्षिस देईन,'' अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सय्यद जाफर यांनी केली. आरोग्यमंत्री डॅा. प्रभुराम चौधरी हे सांची मतदारसंघाचेच प्रतिनिधित्व करतात.

नागरिकच घेतात स्वत:चा स्वॅब

काहीवेळा नागरिकच स्वत:च स्वॅब घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बागकाम करणारा कर्मचारी त्यांना स्वॅब कसा घ्यायचा हे आधी सांगतो. नंतर नागरिकांनाच घशातील स्वॅब घेण्यासाठी सांगत आहे. नागरिकही स्वत:च स्वॅब घेत आहेत. हा कर्मचारी पीपीई कीटही घालत नाही. या प्रकारामुळे कोरोना चाचणीचे भयाण वास्तव समोर आले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख