अर्थमंत्र्यांच्या त्या घोषणेने गडकरींना आठवले कॉलेजचे दिवस  - Gadkari remembered his college days with that announcement of the Finance Minister | Politics Marathi News - Sarkarnama

अर्थमंत्र्यांच्या त्या घोषणेने गडकरींना आठवले कॉलेजचे दिवस 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार म्हणून वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रतिक्रिया देताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या एका घोषणेमुळे आपल्या कॉलेजच्या दिवसातली स्कूटर आठवली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात वायू प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार म्हणून वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले आहे. सीतारामन म्हणाल्या या धोरणामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट लावता येईल. यामुळे इंधन-कार्यक्षम, पर्यावरणास अनुकूल वाहनांना प्रोत्साहित करण्यास मदत होईल. ज्यायोगे वाहनांचे प्रदूषण आणि तेल आयात कमी होण्यास मदत मिळेल. या धोरणावर गडकरी बोलत होते.

मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो, त्यावेळी ३०-३२ चे अॅव्हरेज देणार्या स्कूटरवर आम्ही झोकात मिरवायचो. तेव्हा मी म्हणायचो की, माझी गाडी ३२ चे अॅव्हरेज देते, आता तर 80 मायलेजच्या गाड्या आल्या आहेत' असं गडकरी म्हणाले. जुन्या गाड्या स्क्रॅपिंग करण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करत गडकरी यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील स्कूटरवरील सफरीची आठवण सांगितली.  

गडकरी म्हणाले, पुढच्या पाच वर्षांत भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. छोट्या आणि मध्यम उद्योगांबरोबर वाहन उद्योग मोठा होत आहे. हा उद्योग 6 लाख कोटींच्या उलाढालीचा होईल. त्यामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट आवश्यकच आहे, जुनी वाहनं प्रदूषण खूप करतात. त्यामुळे ती पर्यावरणाला हानीकारक आहेत. ती रस्त्यावर धावणं बंद करणं हिताचं आहे. म्हणूनच स्क्रॅपिंग पॉलिसी आणण्यात येणार आहे. पुढच्या 15 दिवसात वाहनांच्या विल्हेवाटीसंदर्भातले नियम जारी केले जातील, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

 

काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?

जुन्या वाहनांची विल्हेवाट लावायची जबाबदारी वाहन मालकांची आहे. 20 वर्षांपूर्वीच्या गाड्या यापुढे वापरता येणार नाहीत. सविस्तर धोरणाची घोषणा पंधरा दिवसात करू, असं गडकरी यांनी सांगितलं आहे. या धोरणानुसार 51 लाख छोटी वाहनं स्क्रॅप होतील. 17 लाख मध्यम वाहनांचंही रिसायकलिंग होईल. यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल. नवी वाहनं रस्त्यावर येतील. जुन्या वाहनांचं स्टील, इतर धातू, रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे. या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल. 

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख