गुड न्यूज :  रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मोफत उपलब्ध... - Free remdesivir injection And Oxygen To All Praful Patel | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

गुड न्यूज :  रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मोफत उपलब्ध...

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 एप्रिल 2021

खासगी रुग्णालयांतील उपचारांचे दरही सरकारने ठरवून दिले आहेत.

दमण : देशात कोरोना संक्रमणाचा प्रसार झपाट्याने होत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरसह लसींचाही तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लशींसाठी केंद्राकडे ओरड होत आहे, मात्र,  दादरा-नगर हवेली व दमण दीव या केंद्रशासित प्रदेशात  रेमडेसिवीरसह ऑक्सिजनही  मोफत देण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

  रेमडेसिवीर आणि कोरोना लस केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली आणि दमण-दीवचे प्रशासक प्रफुल पटेल यांनी हा निर्णय घेतला आहे. या केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य विभागाने दादरा नगर हवेली आणि दमण-दीवमधील अनेक खासगी रुग्णालयांना कोरोनावरील उपचारांसाठी कोविड सेंटर बनवले आहे. खासगी रुग्णालयांतील उपचारांचे दरही सरकारने ठरवून दिले आहेत.

खासगी आणि सरकारी रुग्णालयांत किती ऑक्सिजन रेमडेसिविर उपलब्ध आहे, उपचारांचा दर्जा, केंद्र सरकारने नियमानुसार होतो आहे की नाही, याच्या तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.  

दादरा नगर हवेली आणि दमण जिल्ह्याच्या खासगी रुग्णालयांत कोरोना उपचारांना मंजुरी दिली असून प्रशासनाकडून रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन मोफत उपलब्ध करून देण्याचा आदेश नुकताच दिला आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. मृतांची संख्याही वाढत आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.59 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे 1,761 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.  सोमवारी कोरोनाचे विक्रमी २.७४ लाख रुग्ण आढळले होते. 
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख