नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. हा देश केवळ चारच लोक चालवत आहेत, 'हम दो, हमारे दो'. त्यांच्यासाठीच नोटाबंदीही करण्यात आली, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी आज लोकसभेत कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने कृषी कायद्यांवर चर्चा होणार नसल्याचे सांगितले. पण मी आज केवळ कृषी कायद्यांवरच बोलणार असल्याचे सांगत राहुल यांनी मोदी व शहांवर निशाणा साधला. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी त्यांच्या भाषणावर अनेकदा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना मध्येच भाषण थांबवावे लागले.
राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान आक्रमक पवित्रा घेतला होता. ते म्हणाले, तिनही कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांमुळे शेतकरी उध्वस्त होतील. त्यांची जमीन भांडवलदारांना जाईल. मालाला रास्त भाव मिळणार नाही. बाजार समित्यांचे अस्तित्व संपविण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. हा देश केवळ चार लोक चालवत आहेत. हे कायदेही त्यांच्यासाठीच आणण्यात आले आहेत, अशी टीका करत राहुल गांधी यांनी अंबानी व अदानी यांनाही लक्ष्य केले.
कृषी कायद्यांमुळे देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त होईल. देशात नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत देशातील शेतकरी, मजूर व छोट्या व्यापाऱ्यांना कमजोर करण्याचा हा प्रयत्न नोटबंदीपासून सुरू झाला आहे. ही नोटबंदीही पंतप्रधानांनी 'हम दो हमारे दो'साठी करण्यात आली.
शेतकरी आंदोलन संपुर्ण देशाचे
कृषी कायद्यांवरून सुरू असलेल्या आंदोलन केवळ शेतकऱ्यांचे नसून संपुर्ण देशाचे आहे. शेतकऱ्यांनी रस्ता दाखविला आहे. आता संपूर्ण देश एका आवाजात 'हम दो हमारे दो'च्या विरूध्द बोलेल. शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. आता तेच तुम्हाला हटवतील. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील, अशा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
शेतकऱ्यांना श्रध्दांजली
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर काहींनी आत्महत्या केली आहे. त्यांना शहीद म्हणत राहुल गांधी यांनी सभागृहाला दोन मिनिटे उभे राहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्याची विनंती केली. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे खासदार दोन मिनिटे उभे राहिले. पण सत्ताधारी बाकांवरून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
लोकसभा सभापतींची नाराजी
राहुल गांधी यांच्या श्रध्दांजली वाहण्याच्या आवाहनावर सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आपणच मला इथे बसविले आहे. ते काम मला करू द्या, असे म्हणत बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्या कृतीवर आक्षेप घेतला.
Edited By Rajanand More

