तडप तडप के मारें गे, अशी जेलरला धमकी देणारा माजी खासदार शहाबुद्दीनचे कोरोनाने निधन - former rjd mp mohammad shahabuddin dies tihar jail due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

तडप तडप के मारें गे, अशी जेलरला धमकी देणारा माजी खासदार शहाबुद्दीनचे कोरोनाने निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

शाहबुद्दीन हे तिहार कारागृहात शिक्षा भोगत होते. दुहेरी हत्याकांडात त्यांना शिक्षा झाली होती.

नवी दिल्ली : बिहारच्या सिवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याचे कोरोनामुळे शनिवारी निधन झाले. मंगळवारी त्याचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता.  पंडित दिनदयाल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. लालू प्रसाद यादव यांचा उजवा हात म्हणून त्याची ओळख होती. तेजस्वी यादव यांनीच शहाबुद्दीनचे निधन झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. 
 
राजदचे माजी खासदार असलेला शहाबुद्दीन हा तिहार कारागृहात शिक्षा भोगत होता. दुहेरी हत्याकांडात त्यांना शिक्षा झाली होती.  १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सुप्रीम कोर्टने  सिवान कारागृहातून त्यांची रवानगी तिहारमध्ये केली होती. ता. २० एप्रिल रोजी त्याला  कोरोना झाल्याचे आढळले. त्याची प्रकृती अचानक बिघडली.  त्याला व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्याचा मृत्यू झाला. 

तीन आठवड्यापासून त्यांच्या कुटुंबियातील कोणीही त्याला भेटण्यास आले नव्हते. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचा बाहुबली म्हणून त्यांची ओळख होती. ते दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिलेले होते.  मोहम्मद शहबुद्दीन यांचा बिहारमध्ये दबदबा होता.

न्यायाधीश, जेलर, जिल्हाधिकारी असो की एसपी या सर्वांना धमकी देण्याचे गुन्हे शाहबुद्दीन यांच्या नावावर होते. सिवान जिल्ह्यात त्याची दहशत होती. सुमारे तीसहून अधिक गुन्ह्यांसाठी खटले सुरू होते. त्यासाठी खास न्यायालय स्थापन करण्यात आले होते. त्यात आठ खून, 20 खूनाचे प्रयत्न, अपहरण आणि खंडणी असे गुन्हे होते. अनेक गुन्हेगारी कृत्याची तर नोंदही घेतलेली नव्हती. सिवानमध्ये अनेक जण अचानक गायब व्हायचे. त्यांचा पुढे कधीच तपास लागायचा नाही. सिवान जिल्ह्यातील प्रतापपूर भागात शाहबुद्दीनचे किल्लेवजा हवेली होती. या हवेलीच्या खाली शेकडो मृतदेह पुरलेले असावेत, अशी तेव्हा चर्चा होती.

सीपीआय (मार्क्सवादी-लेनिनचे) कार्यकर्ते मुन्ना चौधरी यांचे अपहरण आणि खून प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. शाहबुद्दीनच्या अनेक खटल्यांतील साक्षीदार फितुर व्हायचे किंवा ऐनवेळी आरोपी ओळखत नसत त्यामुळे खटल्याचा निकाल योग्य लागत नसे. मात्र मुन्ना चौधरीच्या खटल्यातील एका साक्षीदाराने अपहरण करणारा शाहबुद्दीनच असल्याचे न्यायालयात सात वर्षांनंतर ओळखल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ लागली.  

तुरुंगात जेलरला, तुझे तडप तडप के मारेंगे, अशी धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. त्याच्या खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाला गायब करण्याची धमकी त्याच्या वकिलाने भर कोर्टात जुलै 2009 मध्ये दिली होती. त्यानंतर पाटणा उच्च न्यायाालयाने खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा वकिला महताब आलमच्या विरोधात दाखल केला होता. आॅगस्ट 2006 मध्ये दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या साथीदारांना वाॅर्डमध्ये येण्यापासून तेव्हा बंदोबस्तावर असलेले जेलर वसिष्ट राय यांनी अडविले. तेव्हा शाहबुद्दीनने त्यांना धमकी दिली होती. ``खूप दिवस झालेत तुमची पिटाई होऊन. मला जामीन मिळू द्या मग तुमची कशी धुलाई करतो ते पाहा, अशा शब्दांत त्याने धमकावले होते. दुसऱ्या दिवशी त्याने जेलरलाही तडपा तडपा के मारेंगे, अशी धमकी दिली होती. तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर त्याचा अनेकदा गाड्यांचा मोठा ताफा निघत असे. त्या वेळी या ताफ्यांत 300 ते 500 गाड्या असत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख