श्रीलंका अन् नेपाळमध्येही नाही उमलणार 'कमळ'; भाजपच्या पक्ष विस्तारावरून वाद... - Formal Objection Conveyed by Nepal On Biplab Debs BJP Expansion Remark | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीलंका अन् नेपाळमध्येही नाही उमलणार 'कमळ'; भाजपच्या पक्ष विस्तारावरून वाद...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

गृहमंत्री अमित शहा यांची नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचे सरकार आणण्याची योजना असल्याचे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी केले होते.

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांची नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचे सरकार आणण्याची योजना असल्याच्या वक्तव्य करून त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी वाद केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर श्रीलंकेपाठोपाठ आता नेपाळनेही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे बिप्लव देव पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.

बिप्लव देव यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर श्रीलंकन निवडणूक आयोगानेही या चर्चेवर महत्वाचे विधान केले आहे. श्रीलंकेतील निवडणूक आयोगाचे प्रमुख निमल पंचीवा यांनी भारतात सुरू असलेल्या या चर्चेवरून खुलासा केला आहे. ते म्हणाले, ''श्रीलंकेतील कोणताही राजकीय पक्ष विदेशातील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा समुहाशी संबंध ठेऊ शकतो. मात्र, अन्य देशांतील पक्षाला श्रीलंकेत काम करण्यास आमचा निवडणूक कायदा मान्यता देत नाही.''

श्रीलंकेपाठोपाठ नेपाळनेही आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर एका युजरने बिप्लव देव यांच्या वक्तव्याचे वृत्त शेअर केले होते. त्यावर नेपाळचे विदेश मंत्री प्रदीप ग्यावली यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. देव यांच्या वक्तव्याबद्दल आपण भारताकडे नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. 

बिप्लव देव हे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून अडचणीत येतात. आताही त्यांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती सार्वजनिक करून वाद निर्माण केला आहे. नुकतेच अगरतळा येथील भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांना २०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती दिली. 

ते म्हणाले होते की, ''अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष असताना अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळविली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या विदेशातील विस्तारावरही चर्चा केली होती. भाजपचे उत्तर-पूर्व झोनल सचिव अजय जमवाल म्हणाले होते की, भाजपाने अनेक राज्यांत सत्ता मिळविली आहे. त्यांना उत्तर देताना अमित शहा म्हणाले, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहे. आपल्याला श्रीलंका आणि नेपाळमध्ये सत्ता आणण्यासाठी पक्षाचा विस्तार करायचा आहे,'' असा दावा देव यांनी केला होता.  

''देशात २०१४ मध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सार्कची देशांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांचाही समावेश होता. कारण भारताला शेजारील देशांसोबत पुढे जायचे होते,'' असेही ते म्हणाले होते.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख